![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा बुधवारी १४ वा दिवस होता. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडले असून, आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आंदोलनाच्या १४ व्या दिवशी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलकांचे प्रतिनिधी तसेच आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनचे राहुल डंबाळे आणि राहुल नागटिळक यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंत्री संजय शिरसाठ यांनी आंदोलकांच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. तसेच २०२३ च्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर करत असल्याचे सांगत, सर्वंकष समान धोरणामुळे २०२४ व २०२५ च्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या बैठकीत मंत्री शिरसाठ यांनी आमरण उपोषणास बसलेल्या व संशोधक सुरेखा वासनिक व किरण देवकरे यांच्यासोबत थेट संवाद साधला. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पूर्णपणे सकारात्मक असल्याने त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही मंत्री महोदयांनी यावेळी केली. या बैठकीनंतर आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनचे प्रतिनिधी राहुल डंबाळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी मंत्री शिरसाठ यांनी तात्काळ मुख्यमंत्री यांच्यासमवेत मुख्य बैठक आयोजित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रशासनाच्या आणि सरकारच्या भूमिकेकडे आता सर्व आंदोलक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
Source link
बार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी मंत्री शिरसाठ यांची चर्चा:मागण्यांबाबत सरकार सकारात्मक; उपोषण मागे घेण्याची विनंती केली