![]()
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर खासदार भास्कर भगरे यांनी बुधवारी (दि. २) मध्य रेल्वेच्या नागपूर व भुसावळ विभागाच्या रेल्वे समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला. भुसावळ विभागाच्या प्रबंधकांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. समितीचे अध्यक्ष खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजेश श्रीवास्तव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व विविध खासदार उपस्थित होते. भगरे यांनी दिंडोरी मतदारसंघातील विविध रेल्वे प्रश्न मांडले. नांदगाव स्थानकावर झेलम व अमरावती एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी करण्यात आली. लासलगाव स्थानकावरील पूर्वीचे रेल्वेगाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्यासह देवगिरी, शालीमार, जनता, मुंबई–हावडा मेल, राज्यराणी व जनशताब्दी एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी केली. स्थानकावर लिफ्ट किंवा एस्केलेटरची सुविधाही मागण्यात आली. मनमाड–नाशिक दरम्यानच्या रेल्वे सेवांच्या वेळेतील बदलामुळे प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा, मनमाड–इगतपुरीदरम्यान मेमू सेवा सुरू करावी, तसेच मनमाड–इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला गती द्यावी, लासलगाव–चांदवड मार्गावरील रेल्वे गेट क्रमांक १०५ बंद असल्याने नागरिक, महिला, ज्येष्ठ व विद्यार्थ्यांसाठी फूटओव्हरब्रिज, अंडरपास किंवा पर्यायी मार्गाची मागणी केली. कोटमगाव परिसरातील गेट नंबर १०४ येथील शेतकऱ्यांसाठी रस्ता, निफाड, कासबे सुकेणे व खेरवाडी रेल्वे स्थानकांचा विकास, निफाड स्थानकावर गाड्यांना थांबा, तसेच विविध ठिकाणी रस्ते, पूल व अंडरपास उभारण्याच्या मागण्याही मांडण्यात आल्या. रेल्वे प्रश्न कागदावर न राहता प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
Source link
रेल्वे प्रश्नांवरून भुसावळ प्रबंधकांविरोधात हक्कभंग:विभागाच्या रेल्वे समितीच्या बैठकीत खासदार भगरे आक्रमक