Headlines

गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन आरोपींचे वय 16 वर्षे करा:पुणे पोर्शे कार अपघातातील मृत अनिश अवधियाच्या पालकांची मागणी




पुणे पोर्शे कार अपघातात मुलगा गमावलेल्या अनिश अवधिया यांच्या पालकांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपींचे वय 18 वरून 16 वर्षांपर्यंत कमी करावे, असे ओमप्रकाश अवधिया आणि सविता अवधिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कायद्याचा धाक समाजात राहिला पाहिजे, तरच नियमांचे पालन होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अक्षय जैन उपस्थित होते. अवधिया दाम्पत्याने सांगितले की, आजकाल 18 वर्षांची मुले सर्व सुविधांचा लाभ घेतात. श्रीमंत कुटुंबातील मुले रस्त्यावर महागड्या गाड्या बेदरकारपणे चालवतात, ज्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जातो. गंभीर गुन्ह्यांमध्येही अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. पालकही त्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात, त्यामुळे कठोर शिक्षेसाठी कडक नियम आवश्यक आहेत. मध्यप्रदेशातून पुण्यात आल्यावर त्यांना भीती वाटत होती, पण स्थानिक लोक आणि माध्यमांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. ओमप्रकाश अवधिया यांनी पुणे पोलिसांनी पोर्शे कार अपघाताचा तपास चांगला केल्याचे म्हटले. स्थानिक लोकप्रतिनिधींचा गुन्ह्यातील सहभाग पोलिसांनी तपासला आहे, पण त्याबद्दल त्यांनाच अधिक माहिती असेल, असेही ते म्हणाले. पुण्यात तरुणांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढत आहे. पोलिस आणि प्रशासन यावर प्रयत्न करत असले तरी, अंमली पदार्थांचा वापर वाढलेला दिसत असल्याने यावर अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज आहे, असे ओमप्रकाश अवधिया यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या अक्षय जैन यांनी सांगितले की, आरोपी मुलाचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल हे गुन्हा घडल्यानंतर सुमारे 18 महिने तुरुंगात होते. यामागे माध्यमे आणि पोलिसांचे प्रयत्न महत्त्वाचे होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *