Headlines

चित्रकूटमधील दीनदयाल शोध संस्थानला पुराचा फटका:पुनर्वसनासाठी बालजगतची 14 लाखांची मदत; साडेतीन कोटींचे नुकसान




मध्य प्रदेशातील चित्रकूट आणि सतना जिल्ह्यात सततच्या पावसामुळे मंदाकिनी नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे भारतरत्न नानाजी देशमुख यांनी स्थापन केलेल्या ‘दीनदयाल शोध संस्थान’ला मोठा फटका बसला आहे. संस्थानचे आरोग्यधाम, पंचवटी, दंत चिकित्सालय, नानाजी देशमुखांचे निवासस्थान ‘सियाराम कुटीर’, कृष्णादेवी वनवासी बालिका विद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र यासह संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. पुरामुळे संस्थानचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संकटकाळात पूरग्रस्त परिसराच्या पुनर्वसनासाठी नागपूरच्या ‘बालजगत’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांनी तब्बल १४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे यांनी दीनदयाल शोध संस्थानचे प्रधान सचिव निखिल मुंडले यांच्याकडे १४ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बालजगतच्या प्रकल्प प्रमुख अनुजा परचुरे, उपाध्यक्ष पंकज महाजन आणि सचिव संजय भाकरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. या मदतकार्यात नागपूरच्या दीनदयाल शोध संस्थानने (लक्ष्मीनगर) ५ लाख रुपये, ‘सेंटर फॉर भारतीय मासेस अँड डेव्हलपमेंट एंटरप्राइजेस’ने ५ लाख रुपये, निखिल मुंडले यांनी २ लाख रुपये, तर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आनंद परचुरे आणि उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले आहे. चित्रकूटमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे आणि ती पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्यामुळे दानशूर नागरिक, संस्था आणि समाजधुरिणांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *