![]()
अमरावती शहरातील रवीनगर चौकात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकतर्फी प्रेम आणि ब्रेकअपच्या कारणातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अल्पवयीन गुरुवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून आपल्या महाविद्यालयात जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केल्याची माहिती आहे. रवीनगर चौकात दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. तिच्या मानेवर, छातीवर आणि पोटावर वार करण्यात आले. हल्ल्यावेळी मुलीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार केला. या झटापटीदरम्यान आरोपीचा मोबाईल आणि पाकीट घटनास्थळी पडल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्याम घुगे, राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण, गुन्हे शाखाप्रमुख पोलीस निरीक्षक अतुल वर आणि दिनेश दहातोंडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. दरम्यान, आरोपीची अल्पवयीन मुलीसोबत गेल्या दोन वर्षांपासून ओळख असल्याचा प्राथमिक संशय आहे. अलीकडेच तिने संबंध तोडल्याने आरोपी संतप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याचे स्वरूप पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होईल. घटनेनंतर राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. भरदिवसा गजबजलेल्या चौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Source link
कॉलेज तरुणीची चाकूने भोसकून हत्या:अमरावतीमध्ये ब्रेकअपच्या संशयातून हल्ला; मान, छाती, पोटावर वार करून आरोपी फरार