![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास हिंगोली जिल्हयातून मोठा पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी ता. ३ वसमत येथे २८८ आमदारांचे तिरडी आंदोलन करण्यात आले. तर सेनगाव, गोरेगाव, आखाडा बाळापूर, जवळाबाजार बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या बंदमध्ये सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी जिल्हयातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. वसमत येथे आज दुपारी एक वाजता तिरडी आंदोलन करण्यात आले. तिरडीवर २८८ आमदारांचे छायाचित्र ठेऊन प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. वसमत शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंत्ययात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिकात्मक दहन करण्यात आले. या शिवाय औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर माळवटा शिवारात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर कडून औंढा नागनाथ मार्गे तेलंगणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. कुरुंदा येथेही ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, आज आखाडा बाळापूर, जवळाबाजार, गोरेगाव, सेनगाव या ठिकाणी बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग नोंदविला. एरव्ही ग्राहकांनी गजबजणाऱ्या बाजारपेठांमधून आज शुकशुकाट पहावयास मिळाला. बोल्डा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सेनगाव ते रिसोड मार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने सेनगाव येथे रास्तारोको केला. त्यामुळे रिसोड मार्गे मराठवाड्यातून विदर्भात जाणारी वाहतूक सुमारे दिड तास ठप्प झाली होती. या आंदोलनात कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. सर्वच ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शुक्रवारी हिंगोली बंदचे आवाहन हिंगोली शहर व तालु्क्यात शुक्रवारी ता. ४ बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
Source link
वसमतमध्ये तिरडी आंदोलन:सेनगाव, गोरेगाव, आखाडा बाळापूर, जवळा बाजार बंदला मोठा प्रतिसाद, तीन ठिकाणी रास्तारोको