![]()
आगामी सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात, शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी दक्ष राहावे. उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे व गुलालाचा वापर टाळून पारंपरिक वाद्ये, लेझीम आणि फुलांची उधळण करत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी केले. कन्नड येथील तहसील कार्यालयात गुरुवारी आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी व नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड होते. या बैठकीस तहसीलदार सारिका भगत, पोलिस अधिकारी, तालुक्यातील सरपंच, पोलिस पाटील व गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार सारिका भगत यांनी बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही गणेशमूर्तीची स्थापना करू नये. मूर्तीची स्थापना खासगी जागेतच करण्यात यावी. ग्रामीण भागात सलोखा टिकून राहण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना अधिकाधिक गावांमध्ये राबवावी. यासाठी सरपंच आणि पोलिस पाटील यांनी आपापसांत सातत्याने सुसंवाद ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. या बैठकीला उषा सरदार राठोड, शुभांगी सूर्यवंशी, निर्मला पवार, सीमा पवार, अरविंद धनेधर, भाग्यश्री शिंदे, सुनीता चव्हाण, विठाबाई पवार, उषा वडनेरे, गणेश सोनगिरे, राजश्री गुंजाळ यांच्यासह सर्व पोलिस पाटील उपस्थित होते. तसेच कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नारायण गीते, पिशोरचे सपोनि कुणाल सूर्यवंशी, देवगाव रंगारीचे सपोनि सिद्धेश्वर गोरे, खुलताबादचे पोलिस निरीक्षक महाजन, दफेदार संतोष नवगिरे, गौतम सातदिवे, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, योगेश सोनवणे, प्रशांत काळे, तालुका पुरवठा अधिकारी नीलेश राठोड, राजकुमार खेत्रे, भगवान शिसोदे, संदेव पवार, संतोष सवाई आदी उपस्थित होते. वाहतुकीचे नियोजन करावे बैठकीत पोलिस प्रशासनाकडून रात्री १० वाजेनंतर ध्वनिक्षेपक व वाद्ये पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक नियम स्पष्ट करण्यात आले. शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे यांनी विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचे नियोजन करण्याची व अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली.
Source link
फुलांची उधळण करत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा:उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्रींचे आवाहन