![]()
तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील शेतात बुधवारी रात्री ४५ वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी रात्रीच्या अंधारातही तपासाची चक्रे फिरवून तीन तासांत मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले दगडू बुऱ्हाण तडवी (४५, रा. बहुलखेडा) यांचा असल्याचे समोर आले आहे. बहुलखेडा शिवारातील गट क्रमांक १४६ मधील शेतात कुजलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने सुरुवातीला पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरात चौकशी सुरू केली. तपासादरम्यान गावातून दगडू तडवी ५ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून मृतदेहाची ओळख पटवली. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले. याप्रकरणी सोयगाव ठाण्यात नोंद केली आहे.
Source link
बहुलखेडा शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह:सोयगाव पोलिसांकडून 3 तासांत ओळख पटवण्यात यश