![]()
धार्मिक कार्यातून मनाला मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, तेथेच परमेश्वराचे अस्तित्व अनुभवायला मिळते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने माणूस आपल्या गावापासून दूर जातो. मात्र नवीन ठिकाणी मंदिराची उभारणी करून सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य ही भारतीय संस्कृतीची मोठी ताकद आहे. भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरूप निसर्गाशी जोडले असून, अध्यात्मामुळे मन प्रसन्न होते आणि नकारात्मक विचार दूर होतात, असे प्रतिपादन साईकथाकार माधुरी शिंदे यांनी केले. केडगाव येथील बँक कॉलनी परिसरातील श्री साईबाबा फाऊंडेशनच्या साईबाबा मंदिराच्या स्थापना दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मंदिर परिसरात साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास केडगाव परिसरातील साईभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साईबाबांनी मानवतेला प्रेम, श्रद्धा, सबुरी आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. सबका मालिक एक या विचारातून त्यांनी माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य दिले. गरजूंची सेवा करणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहणे, हा सार्इंच्या शिकवणीचा मुख्य गाभा आहे. साईचरित्राचे वाचन व श्रवण केल्याने मनाला समाधान मिळते, श्रद्धा दृढ होते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळते, असे माधुरी शिंदे यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले. यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे साई सच्चरित्र पारायणाच्या माध्यमातून चांगला पाऊस पडावा, सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी आणि सर्वांचे जीवन आनंदी व्हावे, अशी प्रार्थनाही साईचरणी करण्यात आली. मध्यान आरती नगरसेवक अमोल येवले, नगरसेविका वर्षा काकडे यांच्या हस्ते करण्यात आली. काकड आरती दिलीप नागरे यांच्या हस्ते, तर सकाळची आरती अशोक सोनार यांच्या हस्ते करण्यात आली. पारायणाच्या समारोपप्रसंगी साईंची धुपारती उद्योजक राजेश जग्गी व जयद्रथ खाकाळ यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य डॉ. मुकुंद शेवगांवकर, प्रकाश वाघ, अशोक झिने, अजितसिंग दडियाल, चंद्रशेखर मलिकपेटकर, बाळासाहेब देशमुख, रविंद्र देशपांडे, अजित कातोरे, अशोक जाधव, कावेरी जाधव, संजय बोरगे, योगेश गुंजाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक झिने यांनी केले. संपूर्ण सोहळ्यादरम्यान केडगाव परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. टाळ मृदंगाचा गजर अन् साईनामाचा जयघोष प्रारंभी शाहूनगर परिसरातून साईबाबांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा गजर, साईनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. साईभक्तांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Source link
अध्यात्मामुळे मानवी जीवनातील नकारात्मक विचार होतात दूर:पारायण सोहळ्याची भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता