![]()
आईची ममतेची सावली आणि वडिलांचा भक्कम आधार हरपल्यानंतर मनात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघत नाही. मात्र, तीच वेदना मुक्या प्राण्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी शक्ती बनू शकते, याचा प्रत्यय पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवनात आला. तिसगावचे व्यावसायिक सुरेश परदेशी यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणींना केवळ मनात न ठेवता, जंगलातील निष्पाप वन्यजीवांसाठी अमृतकुंभाचे रूप दिले आहे. पाण्याअभावी वन्य प्राण्यांची भटकंती पाहून परदेशी यांनी दिलेल्य आर्थिक मदतीतून आनंदवन येथे नैसर्गिक पाणवठा साकारला आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक साठे कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी पशू-पक्षी, हरणे आणि रानपाखरे भटकताना पाहून परदेशी यांचे मन हेलावले. “आपल्या आई-वडिलांनी आयुष्यभर आपल्याला प्रेमाची आणि तृप्तीची सावली दिली. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. या विचाराने त्यांना अस्वस्थ केले. आपल्या आई-वडिलांची माया निसर्गाच्या कुशीत कायमची जिवंत राहावी, याच भावनेतून त्यांनी आनंदवनात पाणवठा उभारण्याचा निश्चय करुन तो पूर्णत्वास नेला. अनेकजण आई-वडिलांच्या पश्चात पारंपरिक पद्धतीने स्मरण करतात; पण परदेशी यांनी निष्पाप जिवांची तहान भागवून जन्मदात्यांचे ऋण फेडण्याचा मार्ग निवडला. आनंदवनातील या पाणवठ्यावर जेव्हा एखादी तृषार्त हरिणी किंवा रानपाखरू आपली तहान भागवेल, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील समाधान हेच आई-वडिलांचे शुभाशीर्वाद असतील, अशी भावना परदेशी यांनी व्यक्त केली. हा केवळ दगड-मातीचा पाणवठा नसून एका मुलाने आपल्या जन्मदात्यांच्या चरणी वाहिलेली ‘कृतज्ञतेची ओंजळ’ आहे. या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
Source link
आई-वडिलांच्या स्मृतींना मानवंदना; प्राण्यांसाठी पाणवठा:तहानलेल्या मुक्या जीवांची व्यथा पाहून तिसगावच्या सुरेश परदेशी यांची संवेदनशीलता