![]()
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या मिळवल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी जयवंत साळुंखे (वय ४९) आणि अंकुश विठ्ठल नागर (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना ३ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुराश हा एक आंतरराष्ट्रीय खेळ आहे. महाराष्ट्रात २०१२ पासून ‘कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ या क्रीडा संघटनेमार्फत हा खेळ खेळला जातो. या खेळातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्रे दिली जातात. या प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरीमध्ये खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो. या प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याची माहिती पोलिसांना एका निनावी अर्जाद्वारे मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत असे समोर आले की, २०१६ ते २०१९ या काळात काही स्पर्धा इंडियन कुराश असोसिएशनशी संलग्न नसलेल्या संघटनेने घेतल्या होत्या. तसेच, काही प्रमाणपत्रांवर सह्या करून ती वाटण्यात आल्याचेही पोलिसांच्या तपासात आढळले. सन २०१६ ते २०२२ या कालावधीतील स्पर्धांचा बनावट रेकॉर्ड तयार करण्यासाठी महाराष्ट्र कुराश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा संघटकांकडून नऊ ते दहा वर्षांपूर्वीच्या तारखांची खेळाडूंची खोटी सहभागपत्रे बनवून घेतल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे, स्पर्धेत सहभागी नसलेल्या व्यक्तींची प्रमाणपत्रे खरी असल्याचे पडताळून देण्यात आले. त्यामुळे संबंधित व्यक्तींना खेळाडू आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या गैरप्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पुणे पोलिस करत आहेत.
Source link
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांवर सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्या दोघांना अटक:कुराश खेळात प्रावीण्य मिळवल्याची खोटी प्रमाणपत्रे वापरली, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा