Headlines

स्टेनोग्राफर पद ‘मृत संवर्ग’ करण्याला विद्यार्थ्यांचा विरोध:नांदेडमध्ये उपोषणाचा 11वा दिवस, एक विद्यार्थी रुग्णालयात दाखल




राज्य सरकारने लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पद ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित केल्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील लघुलेखनाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज 11 वा दिवस असून, उपोषणकर्ते भगवान दत्तराव पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सुमारे 90 हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न या आंदोलनामुळे ऐरणीवर आला आहे. भगवान दत्तराव पवार (रा. पिंपळकोटा मगरे, ता. मुदखेड) यांनी लघुलेखक पद पुन्हा सुरू करून भरती प्रक्रिया नियमित करण्याच्या मागणीसाठी 25 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 5 मेचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी 5 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक 26 नुसार स्टेनोग्राफर पद ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे लघुलेखनाचे शिक्षण घेऊन शासकीय नोकरीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या जवळपास 121 विभागांमध्ये लघुलेखक पदासाठी भरती केली जात होती. मंत्रालय, महसूल, वन, जीएसटीसह विविध शासकीय विभागांमध्ये या पदाच्या जागा रिक्त असल्याचा दावा आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, हे पदच मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आल्याने अनेक वर्षांपासून या क्षेत्रात मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. सहा ते दहा वर्षांची मेहनत वाया जाण्याची भीती आंदोलनात सहभागी असलेल्या स्टेनोग्राफीच्या विद्यार्थिनी पूजा भुरके यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांनी सहा ते सात वर्षे, तर काहींनी तब्बल दहा वर्षे या क्षेत्रासाठी मेहनत घेतली आहे. “आमची मागणी साधी आहे. आम्ही अनेक वर्षे स्टेनोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. दर काही वर्षांनी विविध शासकीय विभागांमध्ये या पदासाठी जाहिराती निघतात. अनेक विभागांमध्ये पदे रिक्त आहेत. मात्र शासनाने 5 मे रोजीच्या निर्णयाद्वारे आमचे पदच मृत संवर्ग म्हणून घोषित केले. त्यामुळे आमची वर्षानुवर्षांची मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे,” असे पूजा भुरके यांनी सांगितले. भगवान पवार यांच्या समर्थनार्थ पूजाचेही उपोषण भगवान पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पूजा भुरके यांनीही बुधवारपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. भगवान पवार यांनी दहा दिवसांहून अधिक काळ उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. आपल्या भावाच्या आणि हजारो स्टेनोग्राफी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपण आंदोलनात उतरल्याचे पूजा भुरके यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे 5 मे 2026 रोजीचा शासन निर्णय रद्द करून स्टेनोग्राफर पदाला पुन्हा पूर्ववत दर्जा देण्यात यावा. तसेच रिक्त असलेल्या पदांवर तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग लघुलेखक पद बचाव आंदोलनात भगवान पवार यांच्यासह तुषार देशमुख, गोविंद पाटील, ग. सु. पडोळे, संकेत माडजे, विष्णू कदम, ज्ञानेश्वर मोरे, अनिल ढेंबरे, शिवानंद कदम, मुंजाजी खराणे, प्रभू सावते, अंतेश्वर कानगुलवार, सोनी राठोड, पल्लवी बखाळ, प्रणिता ढगे, संगीता हिंगमिरे, पूजा वने, जना पावडे, विद्या भोसले, निकिता वाडगुरे, पूजा भुरके आणि तनुजा ढगे यांच्यासह अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सक्रियपणे सहभागी झाले आहेत. लघुलेखक पद पुन्हा सुरू करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. उपोषणाचा आज 11वा दिवस असल्याने आता या आंदोलनाकडे शासन काय भूमिका घेते, याकडे हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. पुण्यात दहीहंडी उत्सवानंतर भीषण दुर्घटना!:मंडपाची लोखंडी कमान उतरवताना रॉड डोक्यावर पडला; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उतरवण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुन्या सांगवी परिसरात घडली. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *