![]()
हिंगोली शहरात एनटीसी भागात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक व शहर पोलिसांच्या पथकाने जुगार अडयावर छापा टाकून 18.47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या प्रकरणी 18 जणांवर रविवारी ता. 6 हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड परिक्षेत्रातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्यावर छापा सत्र सुरु आहे. त्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पथक स्थापन केले असून या शिवाय स्थानिक पोलिसांचेही पथक सक्रिय केले आहे. या पथकाकडून माहिती मिळताच छापे टाकले जात आहेत. हिंगोली शहरातील एनटीसी भागात एका ठिकाणी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विेशेष पथकाने तसेच हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, उपनिरीक्षक गिरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, दिलीप लेकुळे, शेख आवेज, गोपिनाथ घुगे, बाळासाहेब कांबळे, आकाश बोथीकर यांच्या पथकाने शनिवारी ता. 5 सायंकाळी छापा टाकला. यामध्ये घटनास्थळी 18 जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 2.16 लाख रुपये रोख, एक कार, 8 दुचाकी वाहने, 15 मोबाईल असा 18.47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई:जुगार अड्ड्यावर छापा टाकून 18.47 लाखांचा मुद्देमाल जप्त, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात, 18 जणांवर गुन्हा दाखल