![]()
येथील दिगर भागातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ताच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी थेट अंत्यविधी थांबवून मृतदेह पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ठेवला. महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन एका महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दीड तासाने हे आंदोलन मागे घेण्यात आले. दिगर भागातील हरणाबाई नामदेव नवले यांचे शनिवारी निधन झाले. रविवारी सकाळी दिगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन होते. मात्र, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता एका पुलाचे काम व हद्दीच्या वादामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. मृतदेह स्मशानभूमीत कसा न्यायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचा राग शांत झाला. त्यानंतर दिगर पंच कमिटीने तात्पुरत्या स्वरूपात जेसीबीच्या साह्याने रस्ता समपातळीत करून दिला. त्यानंतर नवले यांच्या पार्थिवावर दिगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. हरणाबाई यांच्या पश्चात तलाठी राजू, देविदास नवले ही दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पिशोर ग्रामपंचायतीच्या इतिहासात मृतदेह कार्यालयासमोर ठेवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जैवंताबाई खडके यांच्या निधनानंतरही रस्त्याच्या प्रश्नावरून असाच प्रकार घडला होता. रामू आप्पा नवले यांनी सांगितले की, ग्रामस्थांना मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत. २४ ऑगस्टला दिगर पंच कमिटीने उपविभागीय अधिकारी, कन्नड तहसील, पिशोर ठाणे यांना निवेदन दिले होते. मात्र, दखल घेतली नाही. नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे, मंडळ ाधिकारी अलका पट्रे, पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. एका महिन्याच्या आत रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले. Ãस्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत नदीकाठच्या शेतकऱ्यांनी हरकत घेतली होती. यावर तोडगा काढत, भूमी अभिलेख कार्यालयाकडून एका महिन्यात मोजणी पूर्ण करणार आहे. – दिलीपकुमार सोनवणे, नायब तहसीलदार
Source link
स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ताच नाही:पिशोर ग्रा.पं.समोर दीड तास ठेवला मृतदेह, दिगर भागातील ग्रामस्थ आक्रमक; पाच वर्षांपासून रस्ता प्रलंबित