![]()
केडगाव उपनगरामधील शाहूनगर परिसरात महावितरणच्या कारभाराचा अजब नमुना पाहायला मिळत आहे. शाहूनगर बस स्टॉप ते टायपिंग इन्स्टिट्यूट दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर ४४० व्होल्टच्या वीजवाहक ओव्हरहेड तारा थेट रस्त्यातच लोंबकळत आहेत. दोन विद्युत खांबांमधील अंतर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने मध्यभागी तारा खाली झुकल्या आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दिवसा या तारा उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत असल्याने वाहनचालक अत्यंत सावधगिरीने, जीव मुठीत धरून वाहने पुढे नेतात. मात्र, रात्रीच्या वेळी अंधारामुळे आणि वाहनांच्या प्रकाशात या धोकादायक तारा स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर आतापर्यंत अनेकदा अपघात झाले आहेत. रस्त्यावर लटकणाऱ्या या जिवंत तारांमुळे भीषण अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी महावितरणच्या प्रशासनाचे याकडे वारंवार लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या संतापानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणीदेखील केली होती. मात्र, अनेक दिवस उलटले तरीही प्रशासनाने ही धोकादायक परिस्थिती जैसे थेच ठेवली आहे. या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिक व वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या रस्त्यावरून लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी ये-जा असते. त्यामुळे महावितरणने कोणतीही मोठी जीवितहानी घडण्याची वाट न पाहता तात्काळ या तारांचे योग्य पोल उभारून ताण द्यावा, अशी मागणी होत आहे. महावितरण आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नियमांनुसार, लोकवस्ती व मुख्य रस्त्यांवरून जाणाऱ्या ४४० व्होल्टच्या कमी दाबाच्या ओव्हरहेड तारांची जमिनीपासूनची किमान उंची ५.८ मीटर (सुमारे १९ फूट) असणे बंधनकारक आहे. तसेच दोन पोलमधील अंतर ठराविक मर्यादेतच असावे, जेणेकरून तारा लोंबकळणार नाहीत. स्थानिक नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही ही समस्या सुटलेली नाही. दुर्लक्षामुळे महावितरण प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप होत असून, प्रशासनाने दुरुस्ती न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा शाहूनगरवासीयांनी दिला आहे. ओव्हरहेड तारांची उंची १९ फूट असावी
Source link
शाहूनगरवासीयांचा सवाल:वीजवाहक तारांखालून जीवघेणा प्रवास प्रशासन अपघाताची वाट पाहतेय का?, अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’