![]()
पुण्यात महर्षी दयानंद सरस्वतींच्या पुणे प्रवास प्रवचनांचा 151 वा स्मृती समारंभ पिंपरी येथील आर्य समाज भवन येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वेदपालजी आर्य यांनी सांगितले की, महर्षी दयानंद सरस्वतींनी 1875 साली पुण्यात 35 व्याख्याने दिली होती. या व्याख्यानांमधून त्यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला. हा स्मृती समारंभ महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, पिंपरी, पुणे, नाना पेठ, वारजे, खडकी, आळंदी आणि चिंचवड आर्य समाजाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी आर्य समाज प्रधान सुरेंद्र करमचंदानी होते. सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीचे महामंत्री ॲड. प्रकाश आर्य, आर्य प्रतिनिधी सभा दिल्ली महामंत्री विनय आर्य, राजस्थानचे वैदिक विद्वान आचार्य कर्मवीर मेधार्थी आणि नर्मदापुरम मध्य प्रदेश येथील ऋतूस्पती आर्य हे प्रमुख उपस्थित होते. आचार्य कर्मवीर मेधार्थी यांनी सांगितले की, 175 वर्षांपूर्वी पुण्यात महर्षी दयानंद सरस्वतींच्या व्याख्यानांना आणि मिरवणुकीला विरोध झाला होता. मात्र, आज त्याच पुण्यातील ऐतिहासिक म्हस्के वाडा ते भिडे वाडा दरम्यानच्या मिरवणुकीत पुणेकरांनी पुष्पवृष्टी केली. या विचार परिवर्तनासाठी 151 वर्षे लागली, असे ते म्हणाले. ऋतूस्पती आर्य म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला महर्षी दयानंद सरस्वतींचे विचार मार्गदर्शक ठरतील. महर्षींनी सती प्रथेला विरोध करून महिलांना सन्मान मिळवून दिला. त्यांनी वेद पठणासाठीचा भेदभाव नाकारला आणि सर्वांसाठी गुरुकुल स्थापन करून महिलांनाही वेद पठणाची मुभा दिली. महामंत्री विनय आर्य यांनी सांगितले की, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा जोतीराव फुले, उद्योगपती नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि पुण्यातील शेकडो विद्वानांच्या उपस्थितीत महर्षी दयानंद सरस्वतींनी मोमीनपुरा येथील मागासवर्गीय वस्तीत वेदांवर व्याख्यान देण्याचे धाडस केले. युवा पिढीने भारताचा हा गौरवशाली इतिहास अभ्यासावा आणि महर्षी दयानंद यांच्या विचारांचा प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. ॲड. प्रकाश आर्य म्हणाले की, समाजातील जातीभेद नष्ट करणे हा स्वामी दयानंदांचा उद्देश होता. त्यांच्यासारखा दुसरा गुरु होणे नाही. मनोरंजन आणि भौतिक सुखांच्या मागे लागलेल्या युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे काम आर्य समाज प्रतिनिधींनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Source link
पिंपरीमध्ये महर्षी दयानंद सरस्वतींच्या प्रवचनांचा 151 वा स्मृती समारंभ:वेदपालजी आर्य म्हणाले- त्यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला