Headlines

वायसी कॉलेज परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा गोंधळ:दोषींवर कारवाईची मागणी करत विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा




साताऱ्यातील वाय. सी. कॉलेजशी संबंधित सृष्टी बिरामणे आत्महत्या प्रकरणाचे पडसाद सोमवारी (दि. ७) महाविद्यालय परिसरात उमटले. या प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केल्याने कॉलेज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सृष्टी बिरामणे यांच्या आत्महत्येप्रकरणी संपूर्ण घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याबरोबरच महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, अभाविपचे कार्यकर्ते महाविद्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थितीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयीन परिसरातील विद्यार्थी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सृष्टी बिरामणे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनेमागील सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी तसेच विविध संघटनांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे सोमवारी वाय. सी. कॉलेज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण राहिले. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संबंधितांच्यातून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *