![]()
नागपूर एसीबीने महावितरणच्या एका कंत्राटी लाईनमनला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ५,१७० रुपयांचे थकलेले वीजबिल न भरल्यामुळे काढून नेलेले दुकानाचे वीज मिटर परत लावण्यासाठी त्याने ८,५०० रुपयांची लाच मागितली होती. मुकेश चिंतामण मस्के (वय ३६, रा. वार्ड नं. ४, डब्ल्युसीएल रोड, सावनेर) असे पकडण्यात आलेल्या लाईनमनचे नाव आहे. तो सावनेर येथील उप कार्यकारी अभियंता कार्यालयात काम करतो. सावनेर येथे फोटो स्टुडिओ चालवणाऱ्या २८ वर्षीय तक्रारदाराचे ५,१७० रुपयांचे वीजबिल थकले होते. त्यामुळे आरोपी मुकेश मस्के याने दुकानाचे मिटर काढून नेले होते. हे मिटर पुन्हा लावण्यासाठी आरोपीने थकलेल्या बिलाशिवाय जास्त पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने २ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने ३ सप्टेंबर रोजी पंचांसमोर लाचेची मागणी तपासली असता, आरोपीने मिटर लावण्यासाठी तडजोडीअंती ८,५०० रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. त्यानंतर सोमवारी, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सावनेर येथील तक्रारदाराच्या स्टुडिओतच एसीबीने सापळा लावला. आरोपी मुकेश मस्के याने तक्रारदाराच्या दुकानात येऊन ८,५०० रुपयांची लाच स्वीकारताच आधीच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. या प्रकरणात सावनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासकीय कामासाठी कुणीही लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर एसीबीतर्फे करण्यात आले आहे.
Source link
महावितरणचा लाईनमन लाच घेताना रंगेहाथ पकडला:5,170 रुपयांचे मिटर लावण्यासाठी 8,500 रुपयांची लाच मागितली; नागपूर एसीबीची कारवाई