![]()
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांनी आपल्या नियुक्तीबाबत केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचे ‘डिक्लरेशन’ घेण्यासाठी मला आग्र्याला जावे लागले, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. भरत गोगावले यांच्या या वक्तव्यामागील राजकीय संदर्भ लक्षात घेतल्यास रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष पुन्हा समोर आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून भरत गोगावले आग्रही होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय महायुतीसाठी डोकेदुखी ठरला होता. राज्यात सत्ता स्थापन होऊन बराच काळ लोटल्यानंतरही रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नव्हता. अखेर रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीचा उल्लेख करत केलेल्या आग्रा आणि ‘डिक्लरेशन’च्या टिप्पणीची आता जोरदार चर्चा सुरू आहे. रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष यापूर्वीही अनेकदा उघडपणे समोर आला आहे. शिंदे गटातील नेत्यांनी रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी यापूर्वी रायगडचे पालकमंत्रिपद तब्बल दीड वर्ष सुनील तटकरे यांनी अडवून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीनंतरही रायगडमधील श्रेयवाद आणि राजकीय संघर्ष संपलेला नसल्याचे चित्र आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरूनही महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, अखेर शिंदे गटाने नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा दावा मागे घेतल्यानंतर गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्याने दोन्ही जिल्ह्यांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले. शरद पवारांवर टीका, मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर दरम्यान, भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांनी योग्य वेळी निर्णय घेतला असता तर समाजाला फायदा झाला असता, असे गोगावले यांनी म्हटले होते. गोगावले यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हे लोक शरद पवारांनी काय केले, काय केले असे बोलतात; मग यांनी स्वतः काय दिवे लावले आहेत? असा सवाल करत जरांगे यांनी गोगावले यांना प्रत्युत्तर दिले. भरत गोगावले हे आपल्या स्पष्ट आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आता रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत त्यांनी केलेल्या ‘आग्र्याला जाऊन डिक्लरेशन घ्यावे लागले’ या मिश्किल वक्तव्यामुळे महायुतीतील रायगडच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रायगडमध्ये गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पुढील काळात कोणते वळण घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 10 वा दिवस:सरकार जाणूनबजून हलगर्जीपणा करतंय, आंदोलकांवर हल्ल्याचा कट; फडणवीसांना बदनाम करण्याचे षड्यंत्र- मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. गेली 2 दिवस त्यांनी उपचार आणि पाणी न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची प्रकृती खराब झाली आहे. सविस्तर वाचा…
Source link
‘पालकमंत्री होण्यासाठी आग्र्याला जावं लागलं’:भरत गोगावलेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!