Headlines

अकोटमध्ये हर हर महादेवच्या जयघोषात कावड शोभायात्रा:27 मंडळांचा सहभाग, उत्सव शिवभक्तांची पायी वारी




‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने तसेच धार्मिक गीतांच्या सुरांनी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अकोट शहर शिवमय झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभक्तांच्या प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात अकोटमध्ये भव्य कावड शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध भागांतून आलेल्या तब्बल २७ कावड मंडळांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. धार्मिक देखावे आणि सजवलेल्या पालख्यांमुळे संपूर्ण शहरात भक्तिरसाचे तरंग उमटले होते. रविवारी रात्रीच शिवभक्त गांधीग्राम येथे दाखल झाले होते. तेथून पहाटेच्या सुमारास पूर्णा नदीचे पवित्र जल कावडीत भरले. शिवभक्तांनी पायी वारीने अकोट शहराच्या दिशेने प्रस्थान केले. अकोला नाका येथे सर्व कावड एकत्र आल्यानंतर कावड यात्रा मंडळाचे अध्यक्ष अनंता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रेला सुरुवात झाली. गणपती मंदिराची कावड परंपरेनुसार सर्वात अग्रस्थानी होती. या शोभायात्रेत धार्मिक व सामाजिक देखावे होते. देवी-देवतांच्या सजवलेल्या पालख्या होत्या. सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे देखावे नागरिकांचे खास आकर्षण ठरले. शहरात शांतता व कायदा-सु व्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने १७४ उपद्रवी घटकांवर तडीपारीची कारवाई केली होती. ही शोभायात्रा अकोला नाक्यावरून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोनू चौक, कालंका चौक, सावरकर चौक व जयस्तंभ चौक मार्गे तपेश्वरी महादेव मंदिरात पोहोचणार आहे. यात्रेच्या मार्गावर नागरिकांकडून शिवभक्तांसाठी फराळ, चहा व पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या २७ मंडळांनी घेतला सहभाग गणपती मंदिर कावड उत्सव, पंचमुखी महादेव संस्थान, शनवारा शिवभक्त मंडळ , तपेश्वरी शिवभक्त मंडळ, जय भवानी शिवभक्त कावड, श्रावणबाळ शिवभक्त कावड मंडळ, जयशक्ती शिवभक्त मंडळ, नवहिंद ग्रुप कावड, वीर लहुजी शिवभक्त कावड मंडळ, जय गजानन कावड मंडळ, मोरया शिवभक्त मंडळ, जिजामाता शिवभक्त मंडळ, शिवछत्रपती शिवभक्त कावड मंडळ मंडळासह विविध कावड मंडळांनी सहभाग घेतला. २५१ कलशांची कावड ठरली आकर्षण ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने तसेच धार्मिक गीतांच्या सुरांनी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अकोट शहर शिवमय झालेस्थानिक रामटेकपुरा भागातील शिवभक्त मंडळाने साकारलेली २५१ मंगल कलशांची भव्य कावड विशेष आकर्षण ठरली. मोठ्या संख्येने कलशांची केलेली सजावट आणि त्याची भव्य रचना पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यासोबतच १५१ कलशांच्या दोन कावडींनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *