बुलढाण्यात महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजप आमदार श्वेता महाले आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील शाब्दिक वाद आता अधिक तीव्र झाला असून, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली जात आहे. श्वेता महाले
.
‘बाप तो बाप रहेगा’वरून गायकवाडांचा पलटवार
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरल्याची चर्चा झाली. यावेळी त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता, यावरूनही राजकीय चर्चेला उधाण आले. यानंतर श्वेता महाले यांनी कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याच्या मुद्द्यावरून संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. रॅलीला घाबरून वीज बंद करण्यात आली का, असा सवाल करत त्यांनी समोर येऊन लढण्याचे आव्हान दिल्याचे सांगितले जाते.
या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, “‘बाप तो बाप रहेगा’ हे माणसाने बोललं तर बरं आहे. एखाद्या बाईने म्हटलं की मी बाप आहे, तर बापासारखं शरीर कुठून आणणार? हे बोलणं शोभतं का?” त्यानंतर त्यांनी, “राजकारणातला बाप कोण आहे, हे योग्य वेळी आम्ही दाखवून देऊ,” असा इशाराही दिला.

‘मी घाबरणारा नाही’; वीजपुरवठा खंडित झाल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण
श्वेता महाले यांच्या कार्यक्रमादरम्यान वीज गेल्याच्या घटनेचा संबंध संजय गायकवाड यांच्याशी जोडला जात असल्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “रॅली पाहून घाबरले आणि लाईट बंद केली, असं म्हणता. संजय गायकवाडच्या रॅली लोकांनी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मी कशाला घाबरू?” असा सवाल त्यांनी केला. वीजपुरवठा खंडित होणे हा तांत्रिक विषय असल्याचे सांगत गायकवाड यांनी या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या वेळी आपण कर्नाटकात होतो, त्यामुळे वीज बंद करण्याच्या प्रकाराशी आपला संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘माझ्याकडे हरामाचा पैसा नाही’; वाढदिवसाच्या रॅलीवरून टोला
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मोठ्या रॅलीवरूनही गायकवाड यांनी टीका केली. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात खर्च करून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजू व्यक्तींना मदत करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. “माझ्याकडे हरामाचा पैसा नाही. मी अशी पैशाची उधळपट्टी करणार नाही,” असे ते म्हणाले. वाढदिवसासाठी लोकांना भाड्याने आणण्याची गरज आपल्याला पडत नाही, असा दावाही त्यांनी केला. “माझा वाढदिवस आहे, मला शुभेच्छा द्या, असं अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना सांगून त्यांना कामाला लावण्याची गरज आम्हाला पडत नाही. शुभेच्छा मनापासून दिल्या जातात,” अशा शब्दांत त्यांनी महाले कुटुंबाच्या कार्यक्रमावर निशाणा साधला.
‘त्या माझ्या बहिणीसारख्या’; तरीही राजकीय टोलेबाजी
विशेष म्हणजे श्वेता महाले यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे सांगत गायकवाड यांनी राजकीय मतभेद वेगळे असल्याचे स्पष्ट केले. “श्वेता महाले महिला आमदार आहेत. माझी बहीण, माझी ताई आहेत. मला समोर येऊन बोला म्हणाल्या. बँकेच्या निवडणुकीत आम्ही सोबत होतो. एका ताटात दोन चमच्यांनी आम्ही जेवलो आहोत,” असे गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे समोरासमोर येण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपण कोणतीही स्पर्धा मानत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘तुम्ही बुलढाण्यात भाजप वाढवा, आम्ही चिखलीत शिवसेना वाढवतो’
बुलढाणा आणि चिखली या दोन विधानसभा मतदारसंघांतील राजकीय प्रभावावरूनही गायकवाड यांनी भाष्य केले. “त्यांनी बुलढाण्यात भाजप वाढवावी, आम्ही चिखलीत शिवसेना वाढवू. दोन्ही पक्षांची ताकद वाढली तर त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे. मग विरोध कशाला?” असा सवाल त्यांनी केला. मात्र, त्याचवेळी त्यांनी भाजपने काँग्रेससोबत जाऊ नये, असा इशाराही दिला. “फक्त इकडची भाजप काँग्रेसच्या दावणीला बांधली जाणार नाही, याची काळजी घ्या,” असे ते म्हणाले. यातून बुलढाण्यातील स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेना यांच्यातील स्पर्धा किती तीव्र झाली आहे, याचे संकेत मिळत आहेत.
‘महायुती एकसंघ आहे, पण…’
बुलढाण्यातील या राजकीय संघर्षामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असताना गायकवाड यांनी महायुती एकसंघ असल्याचा दावा केला. “महायुती एकसंघ आहे. 100 टक्के महायुती एकसंघ आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यानंतर काही राजकीय नेत्यांवर नाव न घेता टीका करत त्यांनी महायुतीतील अंतर्गत कुरघोडीवरही भाष्य केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही महायुतीच्या एकत्रित राजकारणाला कितपत अडचणीत आणते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बुलढाण्याच्या विकासावरूनही जुंपली
श्वेता महाले यांनी बुलढाणा शहरातील विकासकामांवर टीका करताना ‘बुलढाण्याचा कचरा चिखलीपर्यंत आला’, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. त्यावरही संजय गायकवाड यांनी पलटवार केला. “बुलढाण्याच्या विकासाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळत आहे. कोण काय बोलतं याला अर्थ नाही. शहरात विकास आहे की कचरा, हे जनतेला माहिती आहे,” असे गायकवाड म्हणाले. याच मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील डीजे आणि मिरवणुकीचाही संदर्भ दिला.
डीजेच्या मुद्द्यावरूनही सरकारला सवाल
मुख्यमंत्री स्वतःच्या वाढदिवसानिमित्त डीजे, पोस्टर आणि बॅनर टाळण्याचे आवाहन करतात, मग त्यांच्या खासगी सचिवाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात डीजेचा वापर का झाला, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. गणपती उत्सवाच्या काळातच डीजेचा मुद्दा का उपस्थित केला जातो, असा प्रश्नही त्यांनी केला. शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्येही मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक वापरले जातात. आवाजाची मर्यादा ओलांडली जात असेल तर पोलिसांनी कारवाई करावी; मात्र केवळ गणपती उत्सवाच्या वेळीच डीजेचा प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
बोर्डाच्या वादातही गायकवाडांनी संबंध नाकारला
कार्यक्रमाच्या परिसरातील फलक किंवा बोर्डाच्या वादावरूनही गायकवाड यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “नगरपालिकेचे कर्मचारी त्यांची ड्युटी करत आहेत. कोणी अवैध बोर्ड लावत असेल तर त्याला विचारले पाहिजे. ही त्यांची ड्युटी आहे. त्यात राजकारण कुठून आले?” असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे वीजपुरवठा आणि फलकाच्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील ‘ऑल इज वेल’चा प्रश्न
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर श्वेता महाले यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवणे, त्यानंतर गायकवाड यांनी केलेली टीका आणि आता दोन्ही बाजूंनी सुरू झालेली शाब्दिक चकमक यामुळे बुलढाण्याच्या राजकारणात वातावरण तापले आहे. एका बाजूला दोन्ही नेते महायुती एकसंघ असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर एकमेकांच्या राजकीय प्रभावाला आव्हान देताना दिसत आहेत. आगामी काळात बुलढाणा आणि चिखली या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी सुरू होणारी स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या तरी श्वेता महाले यांच्या टीकेला संजय गायकवाड यांनी दिलेले प्रत्युत्तर हे बुलढाण्यातील महायुतीच्या अंतर्गत राजकारणातील नवा अध्याय ठरले आहे. ‘राजकारणातला बाप कोण?’ या गायकवाडांच्या इशाऱ्याने या वादाला आता पुढे कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले: म्हणाले- न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या मुलांची पंतप्रधान मोदींकडून चेष्टा, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुणे आणि कोल्हापुरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी