![]()
हिंगोली जिल्हा भीषण दुष्काळाच्या सावटाखाली होरपळत असताना आणि शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना मात्र या गंभीर परिस्थितीचा पूर्णपणे विसर पडला आहे. हिंगोलीच्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांनी तातडीने दुष्काळी परिस्थितीचा आढावा न घेतल्यास, त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला आहे. हिंगोलीमध्ये यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. ऑगस्ट महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे मूग व उडदाचे पीक हाती आलेच नाही. या पिकांच्या शेंगा भरल्या नसल्याने पिके काढून उपयोग काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच जिल्ह्याचे प्रमुख पीक समजले जाणाऱ्या सोयाबीन व कापूस पिकाची देखील हीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी झालेल्या तीन लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. आता सोयाबीन पिकाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेंगा भरल्यास नाही. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्यांच्याही ही बाब लक्षात आली आहे. याशिवाय कापूस, तुर, ज्वारी या पिकांची वाढ देखील खुंटली आहे. सध्या कापूस फुले लागण्याच्या अवस्थेत असून पावसाभावी फुले लागत नसल्याचे चित्र आहे. तर ज्या भागात कापसाला फुले लागली आहेत त्या ठिकाणी उष्ण व दमट वातावरणामुळे फुलगळ होऊ लागली आहे. या प्रकारामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांसोबतच सामाजिक संघटनांकडून केली जाऊ लागली आहे. शेतकऱ्यांकडून देखील दुष्काळी परिस्थिती मागणी केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना मात्र जिल्ह्याचा विसर पडल्याचे असल्याचे चित्र आहे. झिरवळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती तसेच दुष्काळी परिस्थिती बाबत कुठल्याही प्रकारची विचारणा प्रशासनाकडे केली नसल्याचे समजते. पालकमंत्री झिरवळ यांच्याकडून हिंगोली जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न शासन दरबारी कोण मांडणार असा सवाल शेतकरी व सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे. पालकमंत्री झिरवळ यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यातून तीव्रसंतापाची भावना उमटू लागली आहे. या संदर्भात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांचे स्वीय सहाय्यक सचिन वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालकमंत्री महोदय उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर दुसरीकडे आम्ही 16 सप्टेंबरला हिंगोलीत येणार आहोत त्यावेळी पाहू असे सांगत वैद्य यांनी फोन बंद केला.
Source link
हिंगोलीतील दुष्काळाचा पालकमंत्र्यांना विसर:दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडणार, नामदेव पतंगे यांचा इशारा