![]()
गणेशोत्सवात पुण्यातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष नियोजन केले आहे. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होईल. अनंत चतुर्दशीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल ४१ तास मेट्रो सेवा अखंड सुरू राहील. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात, १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री ११ या नियमित वेळेत सुरू राहील. १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी विशेष वेळापत्रक लागू होईल. या काळात मेट्रो सेवा सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहील. २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरू झालेली सेवा २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत सलग सुरू राहील. २७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा पुन्हा सकाळी ६ ते रात्री ११ या नियमित वेळेनुसार सुरू होईल. मध्यवर्ती पुण्यातील गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकावर विशेष व्यवस्था केली आहे. १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान हे स्थानक एकदिशात्मक असेल. प्रवाशांना लोकमान्य टिळक पुतळा येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून स्थानकात प्रवेश करता येईल, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील प्रवेशद्वार क्रमांक २ मधून बाहेर पडता येईल. पेठ भागातील गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मार्गिका १ वरून प्रवास करताना कसबा पेठ स्थानकाचा वापर करावा. मार्गिका २ वरून वनाजच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी डेक्कन जिमखाना, तर रामवाडीच्या दिशेने येणाऱ्यांनी पीएमसी स्थानकावर उतरावे. महात्मा फुले मंडई स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हे स्थानक प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मार्गिका १ आणि २ वरील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर मार्गिका बदलणे टाळावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. त्याऐवजी कसबा पेठ, पीएमसी आणि छत्रपती संभाजी उद्यान या स्थानकांचा वापर करण्याचे मेट्रो प्रशासनाने सुचवले आहे. गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि गर्दीचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी भाविकांनी मेट्रो प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
गणेशोत्सवात पुणे मेट्रो 41 तास अखंड धावणार:14 ते 26 सप्टेंबरदरम्यान विशेष वेळापत्रक; गर्दीच्या काळात दर 5 मिनिटांनी मेट्रो