![]()
पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एमआयडीसी परिसरात हायवाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. शिवाजी बापूराव पठाडे (४२, रा. नारळा, ता. पैठण) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पठाडे हे सोमवारी मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २० एफएफ ०२२६) मुधलवाडी परिसराकडे जात होते. एमआयडीसी परिसरातील अग्निशमन दल कार्यालयाजवळ रस्ता ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने त्यांच्या दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पठाडे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीचा चुराडा झाला. अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी पठाडे यांना तत्काळ पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हेल्मेट वापरा, मृत्यू टळेल दुचाकीवर असताना नेहमी हेल्मेट वापरा. तसेच शक्यतो पूर्ण कपडे आणि शूज घाला. चप्पल किंवा सँडल घालून गाडी चालवणे टाळा, कारण घसरल्यास किंवा अपघात झाल्यास पायाला गंभीर इजा होऊ शकते. या सोबतच दुचाकी चालविण्यापूर्वी टायरमधील हवेचा दाब योग्य आहे की नाही, हे तपासावे. टायर जास्त घासलेले नसावेत.
Source link
हायवाच्या धडकेत पैठणचा दुचाकीस्वार जागीच ठार:एमआयडीसी परिसरातील घटना, हायवा ताब्यात