Headlines

कपीलनगर घरफोडी प्रकरणी 5 आरोपींना अटक:गुन्हे शाखेकडून 32 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त




नागपूर गुन्हे शाखा युनिट ६ ने कपीलनगर येथील घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. बंद घराचे कुलूप तोडून ८४ तोळे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २४ तोळे सोन्यासह एकूण ३२ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीक्षित नगरमध्ये ६३ वर्षीय महेश दयालदास मोटवानी राहतात. ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरात घुसून अलमारीतील ८४ तोळे सोन्याचे दागिने, ९०० ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने १५ ऑगस्ट रोजी किशोर करवाते, आर्यन मेश्राम, संतोष धमगाये आणि संगीता करवाते या चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी तपास वेगाने करत ४ सप्टेंबर रोजी ८ लाखांचे ८ तोळे सोने हस्तगत केले. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी या प्रकरणातील पाचवा आरोपी फरदीन राजीक शेख (वय २५, रा. देसाईगंज, गडचिरोली) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचे सोने-चांदी जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत २४ तोळे सोने, १२५९ ग्रॅम चांदी, सुझुकी ॲक्सेस गाडी, वरना कारचे आरसी बुक, प्लॉट खरेदीची कागदपत्रे, बँक पासबुक, ४ मोबाईल आणि १ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३२ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे आणि युनिट ६ च्या कर्मचाऱ्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *