Headlines

अमरावतीत लेझर लाईटवर बंदी, डीजेच्या आवाजावर नियंत्रण:मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई होणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी आदेश काढले




अमरावतीमध्ये आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः गणेशोत्सवासाठी, डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्याच्या चर्चेने वेग घेतला होता. मुंबई, पुणे, सोलापूर आणि नागपूर येथेही यासंबंधी काही निर्णय घेण्यात आले आहेत. याच धर्तीवर, अमरावतीत तीव्र क्षमतेच्या लेझर आणि प्लाझ्मा लाईट्सवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच, डीजेच्या आवाजावर न्यायालयाच्या निर्देशानुसार डेसिबलची मर्यादा लागू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. गणेशोत्सव जवळ आल्याने लेझर लाईट्स आणि डीजेवर बंदी घालण्याबाबत चर्चा सुरू होती. या काळात काही संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यानुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी पोलिस प्रशासनाला योग्य निर्देश दिले. त्यानुसार, सायंकाळी लेझर आणि प्लाझ्मा लाईटवर बंदी घालणारा, तसेच डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवणारा आदेश जारी करण्यात आला. अमरावती शहर पोलिस प्रशासनाने जारी केलेल्या या आदेशानुसार, गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान डोळ्यांना व आरोग्याला धोकादायक ठरणारे लेझर लाईट आणि प्लाझ्मा लाईट वापरण्यास पूर्णपणे मनाई आहे. तसेच, वाद्य वाजवताना केवळ ‘दोन बेस व दोन टॉप’ लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे व बेन्जो चालक, मालकांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सार्वजनिक शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे. मात्र, यामुळे प्रभावित होणाऱ्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न कसा सोडवला जातो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. डीजे मर्यादेची अंमलबजावणी आणि लेझर लाईटवर बंदीची मागणी ‘आम्ही अमरावतीकर’, एआयएसएफ, ‘आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ’, ‘जाणीव फाऊंडेशन’, अ.भा. नौजवान सभा आदी संस्था-संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. अमरावती शहर हे विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या शहरातील नागरिकांनी उचललेले पाऊल इतर जिल्ह्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा आशावाद या संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. हा निर्णय जारी करण्यापूर्वी अमरावती पोलिस आयुक्तालयाकडून राजापेठ पोलिस ठाणे आणि पोलिस आयुक्तालय येथे डीजे आणि बेन्जो चालक, मालकांची बैठक झाली. या बैठकांना पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके, शाम घुगे आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व डीजे आणि बेन्जो चालक, मालकांनी लेझर व प्लाझ्मा लाईट न लावण्याचे आणि ‘दोन बेस-दोन टॉप’च्या नियमाचे पालन करून सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *