![]()
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या मीरा रोड येथील ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेने विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यावरून काढलेल्या एका फतव्यामुळे नवा राजकीय वाद पेटला आहे. जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाच्या नावाखाली शाळेने विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट आणण्यावर थेट बंदी घातली आहे. सत्ताधारी भाजप आमदाराच्याच शाळेत खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याने पालक वर्गासह राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मीरा-भाईंदर परिसरात पर्युषण पर्वाच्या काळात राजकीय वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पर्युषण काळात ‘मांस विक्री बंदी’ लागू केल्यावरून मोठा राजकीय गदारोळ झाला होता. त्यामुळे आताही या मुद्द्यावरून राजकारण होण्याची शक्यता आहे. दादागिरी खपवून घेणार नाही : राऊत या वादात शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनीही उडी घेत, “धर्माच्या नावावर शाळांमध्ये अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. ही बंधने महाराष्ट्राला दिलेले थेट आव्हान असून, सरकारने या शाळेला तात्काळ टाळे ठोकले पाहिजे,” असा घणाघात केला. शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांनीही शाळेत अशा प्रकारे राजकारण आणणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. दरम्यान, यावरून आता ऐन गणेशोत्सवाच्या काळात राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेची मान्यता रद्द करा, मनसेचे गेटवर आंदोलन या धार्मिक बंधनांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट शाळेच्या प्रवेशद्वारावर कांदा-लसणाची माळ घालून आक्रमक आंदोलन केले. मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रशासनाला जाब विचारत शाळाचालकांवर कडक कारवाईची मागणी केली. “शाळा सुरू करताना धार्मिक बाबी लादणार नाही अशी नियमावली असते. भाजप आमदाराची ही शाळा उघडपणे धार्मिक तेढ निर्माण करत असून, तिची मान्यता तात्काळ रद्द झाली पाहिजे. गरज पडल्यास आम्ही न्यायालयात जाऊ,’ असा सज्जड दम जाधव यांनी दिला. कोणतीही सक्ती नाही पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवलेला संदेश ही कोणतीही सक्ती नसून पर्युषणानिमित्त अहिंसेच्या उद्देशाने केलेले केवळ एक नम्र आवाहन होते. पालकांनी याचे स्वागत केले आहे. कांदा-लसूण आरोग्यासाठी योग्य नाही. यात नाहक राजकारण आणले जात आहे. – नरेंद्र मेहता, भाजप आमदार तथा संस्थापक, सेव्हन स्क्वेअर
Source link
मुंबईतील शाळेत डब्यात बटाटा, कांदा-लसूण आणण्यास मनाई:पालक वर्गासह राजकीय वर्तुळातून तीव्र संताप