![]()
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा एकही कण न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे. दरम्यान, आज कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके हे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर आणि आंदोलनाच्या पुढील वाटचालीवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. ‘शिरसाटांमुळे मला शिंदेंवर बोलावं लागतंय’ सरकारच्या भूमिकेवर आणि नेत्यांच्या वक्तव्यांवर मनोज जरांगे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. “समोरच्याची जशी प्रवृत्ती असेल, तशीच भाषा मला वापरावी लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मला बोलावं लागतं, याचं स्वतः मलाही दुःख आहे. पण शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या बेताल वक्तव्यांमुळे मला त्यांच्या विरोधात बोलावं लागतंय. शिंदेंच्या लोकांनी शिरसाट यांना समज द्यावी की तुमच्यामुळे जरांगे पाटील विरोधात बोलत आहेत. गेली ३ वर्षे याच नेत्यांना माझी भाषा चांगली वाटत होती का?” असा खडा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. 12 तारखेला ठरणार मुंबई आंदोलनाची दिशा सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न आल्याने आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. येत्या 12 तारखेला अंतरवाली सराटी येथे एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतच मुंबईतील नियोजित आंदोलनाची पुढील दिशा, तारीख आणि स्वरूप अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे. सरकारची भूमिका दुसरीकडे, राज्य सरकार मराठा समाजाला त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी माहिती देताना स्पष्ट केले की, मराठवाडा विभागात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी दाखले देण्याची प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत जलदगतीने सुरू आहे. यावेळी त्यांनी मराठवाड्यात वाटप करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांच्या अद्ययावत आकडेवारीची माहितीही प्रसारमाध्यमांसमोर ठेवली. मात्र, जोपर्यंत मागण्यांचा शासन निर्णय (GR) हातात पडत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार?: अजय बारसकरांची थेट ED कडे तक्रार; आरक्षणाच्या नावाखाली 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आधीच राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना, आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारसकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात थेट अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’कडे (ED) तक्रार दाखल केली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी वाळू तस्करीसारखे काळे धंदे करून किमान १००० कोटी रुपयांची अवैध संपत्ती जमा केल्याचा अत्यंत गंभीर आरोप बारसकर यांनी केला आहे. यामुळे आगामी काळात मनोज जरांगे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा
Source link
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस:आज अभिजीत दीपके घेणार जरांगेंची भेट; 12 तारखेला ठरणार मुंबई आंदोलनाची दिशा