![]()
पावसाचा मोठा खंड आणि माना टाकलेली पिके यामुळे राज्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटातून जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दुष्काळाची दाहकता, कर्जमाफी आणि पीक विम्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत, आगामी कॅबिनेट बैठकीत हे प्रश्न लावून धरण्याची आक्रमक मागणी सरकारकडे केली आहे. कोरडा दुष्काळ आणि हेक्टरी १ लाखांची मागणी तुपकर यांनी केवळ प्रशासकीय अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव मंत्र्यांना करून दिली. पावसाअभावी सोयाबीनसह संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, शेतीसाठी पूर्णवेळ वीजपुरवठा, जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे आणि पीक विम्याचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली. कर्जमाफी आणि CIBIL चा मुद्दा शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर लक्ष वेधताना तुपकरांनी सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरली. २०१९ पूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांना न्याय द्यावा आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, असे ते म्हणाले. कर्जाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा ‘सिबिल’ (CIBIL) स्कोअर खराब होऊन त्यांच्या भविष्यातील कर्जाचे मार्ग बंद होऊ नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट आरबीआय (RBI) सोबत चर्चा करून बँकांना योग्य निर्देश द्यावेत, अशी अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय, महाडीबीटीअंतर्गत ट्रॅक्टर, ठिबक सिंचनासाठी मंजूर झालेले अनुदान त्वरित वाटप करण्याची मागणीही करण्यात आली. ‘मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही’ आगामी कॅबिनेट बैठकीत या सर्व प्रश्नांवर ठोस आणि सकारात्मक निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडावे, अशी विनंती तुपकरांनी तिन्ही मंत्र्यांकडे केली. यावेळी चर्चा सकारात्मक झाली असली तरी, परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने सरकारने वेळकाढूपणा करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. जर त्यांच्या मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय झाला नाही, तर राज्यातील शेतकरी मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे,” असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस:आज अभिजीत दीपके घेणार जरांगेंची भेट; 12 तारखेला ठरणार मुंबई आंदोलनाची दिशा मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा एकही कण न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे. दरम्यान, आज कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके हे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर आणि आंदोलनाच्या पुढील वाटचालीवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख मदत द्या:मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही; रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा