Headlines

शेतकरीविरोधी धोरणाविरोधात मूर्तिजापुरात काळा पोळा:पोकळ आश्वासने, अनुदानाचा पत्ता नसल्याने बळीराजा आक्रमक; पोहोचले थेट उपविभागीय कार्यालयावर‎




शासनाच्या मोठ्या घोषणा आणि आश्वासनांनंतरही शेतकऱ्यांच्या पदरात कोणतीही ठोस आर्थिक मदत न पडल्याने संतापलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसील परिसरात ‘काळा पोळा’ साजरा केला. नगरपालिका कार्यालयापासून वाजत-गाजत काढण्यात आलेली सजवलेल्या बैलांची मिरवणूक थेट उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयासमोरील प्रांगणात पोहोचली. तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी विविध घोषणा देत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. निवडणुकीपूर्वी मूर्तिजापूर येथील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. २०१९ पूर्वीचे थकबाकीदार आणि पुनर्गठित खातेदारांना किचकट अटी-शर्ती लावून कर्जमाफीतून बेदखल करण्यात आले. याशिवाय २०२५ या वर्षासाठी हेक्टरी १७ हजार ५०० रुपये पीक विम्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र विमा काढलेल्या वा न काढलेल्या एकाही शेतकऱ्याला अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे पेरण्या उलटल्या, शेती नापेर राहिली, तरीही शासन किंवा कंपन्यांकडून कसलीही भरपाई जाहीर झालेली नाही. तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी कार्यालयाबाहेर येत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्या तातडीने वरिष्ठ स्तरावर पोहोचवण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात जनमंच नागपूरचे प्रा. गौरखेडे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास साबळे, डॉ. संजय उमाळे, प्रमोद राजंदेकर, शरद सरोदे, सुभाष मोरे, बाळासाहेब खांडेकर, अभी पोळकट, योगेश सोळंके, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बबानीया, मनोहर ताकतोडे, प्रफुल्ल मालधुरे, प्रवीण ढगे, स्वप्निल जामनिक, गोपाल तायडे, अरुण बोंडे आदी उपस्थित होते. आंदोलनातून मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या २०१९ पूर्वीचे थकबाकीदार व पुनर्गठित शेतकऱ्यांवरील जाचक अटी रद्द करून तत्काळ सरसकट कर्जमाफी द्यावी. २०२५ हंगामासाठी घोषित केलेला हेक्टरी १७,५०० रुपयांचा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कंपन्यांकडून किंवा शासनाकडून तातडीने आर्थिक भरपाई मिळावी. पावसाअभावी करपलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. तर लेकराबाळांसह आमरण उपोषण करू ^प्रशासनाने केवळ पोकळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची वेळोवेळी दिशाभूल केली आहे. उन्हातान्हात उपोषणे व मोर्चे काढूनही मंत्र्यांच्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. सोयाबीन करपल्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा आणि मुलांचे शिक्षण कसे करायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने त्वरित ठोस आर्थिक मदत दिली नाही, तर यावेळी आम्ही घरात न बसता संपूर्ण कुटुंबासह लेकराबाळांना घेऊन पुन्हा आमरण उपोषणाला बसू. – राजूभाऊ वानखडे, अध्यक्ष, प्रगती शेतकरी मंडळ.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *