![]()
मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. सरकारने मनोज जरांगे यांना वाऱ्यावर सोडले असून, त्यांच्याकडे फिरकायचे नाही असे आदेश प्रशासनाला देणे हा अमानुषपणा आणि क्रौर्य असल्याचा घणाघात राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच, मराठवाड्यातील रखडलेल्या विकास योजना आणि बोगस कामांचा पंचनामा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज नांदेडमध्ये ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आक्रमक जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. ‘हा सरकारचा अमानुषपणा आणि क्रौर्य’ मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, “एका बाजूला मनोज जरांगे हे सलग १३ दिवसांपासून अन्नपाण्याचा त्याग करून हजारो समर्थकांसह उपोषणाला बसले आहेत. तुमचे आणि त्यांचे मतभेद असू शकतात, सगळ्याच मागण्या मान्य करणे शक्य नसेलही, पण तुम्ही चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद केले आहेत. प्रशासनाला त्यांच्याकडे न फिरकण्याचे आदेश दिले आहेत. हा सरकारचा अमानुषपणा आणि क्रौर्य आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्याने काय करायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठवाड्यातील आमचे आंदोलन सरकारचे डोळे उघडण्यासाठीच असल्याचे ते म्हणाले. ‘शिंदे-फडणवीस-पवारांनी केलेली लोकशाहीची शोकांतिका’ विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत यांनी सरकारला लोकशाहीचे धडे दिले. “विरोधी पक्ष हा सरकारचे कान आणि डोळे असतो. जे काम प्रशासन करू शकत नाही, ते काम विरोधी पक्ष करत असतो. आम्ही जनतेचे गाऱ्हाणे मांडत असून, सरकारने ते ऐकून घेतले पाहिजे. मात्र, विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रश्नांना गांभीर्याने न पाहणे ही या महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांनी केलेली लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे,” अशी टीका राऊत यांनी केली. नांदेडमध्ये ‘तुमसे ना हो पायेगा’ जनआंदोलन नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील रखडलेल्या विकास योजना, अपूर्ण प्रकल्प आणि बोगस कामांचा बुरखा फाडण्यासाठी विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून आज नांदेडमध्ये ‘तुमसे ना हो पायेगा’ हे जनआंदोलन होत आहे. या आंदोलनात स्वतः संजय राऊत सहभागी झाले आहेत. सकाळी १० वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन धडकणार असून, दुपारी ३ वाजता रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राऊत यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. “या बोलघेवड्या आणि निष्क्रिय भाजप सरकारच्या कारभाराविरोधात नांदेडचे शेतकरी, शिवसैनिक आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पण हे ‘थापडे’ सरकार आता कोठे लपून बसले आहे?” असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला आहे. या आंदोलनामुळे नांदेडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस:आज अभिजीत दीपके घेणार जरांगेंची भेट; उद्या ठरणार मुंबई आंदोलनाची दिशा मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा एकही कण न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे. दरम्यान, आज कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके हे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर आणि आंदोलनाच्या पुढील वाटचालीवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
Source link
मनोज जरांगेंना वाऱ्यावर सोडणं हा अमानुषपणा:संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, नांदेडमध्ये 'तुमसे ना हो पायेगा' जनआंदोलन