![]()
अकोट कृषिप्रधान संस्कृतीत शेतकरी बांधवांचा जिवाभावाचा सोबती असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण राज्यभरात पारंपरिक उत्साहात साजरा होतो. मात्र, याच दिवशी वर्षभर अविरत भार वाहणाऱ्या कष्टकरी मुक्या प्राण्यांप्रती म्हणजेच गाढवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक परंपरा अकोट शहरात जपली जाते. फरक फक्त एवढाच की बैलांचा पोळा भरतो, तर गाढवांचा पोळा भरवला जात नाही; तरीही पूजनाचा मान मात्र तेवढ्याच भक्तिभावाने दिला जातो. पोळ्याच्या दिवशी बैलांप्रमाणेच गाढवांचा सन्मान करण्याची ही परंपरा येथील भोई आणि कुंभार समाजात पूर्वापार चालत आली आहे. मातीची भांडी, रेती आणि मातीची वाहतूक करणे हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. आधुनिक यंत्रयुगात या व्यवसायाचे प्रमाण कमी झाले असले, तरी अनेक कुटुंबे आजही गाढवांच्या साहाय्याने उदरनिर्वाह चालवतात. वर्षभर ओझे वाहणाऱ्या या प्राण्याला पोळ्याच्या दिवशी कामातून पूर्णपणे विश्रांती (हक्काची रजा) दिली जाते. सकाळीच गाढवाला पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर अंगावर विविध रंगांचे पट्टे मारून, शिंगासारखे डोक्यावर बाशिंग वा हौशी मालक रंगीबेरंगी झुली पांघरून त्यांना सजवतात. घरातील गृहिणी मनोभावे गाढवाचे औक्षण करून पूजा करतात आणि गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्य भरवून त्यांचे आभार मानतात. एरवी समाजात हेटाळणीच्या स्वरात उल्लेख होणारा हा प्राणी पोळ्याच्या दिवशी आपल्या अपार कष्टांमुळे सन्मानाचा मानकरी ठरतो. “आमच्या रोजगारात आणि संसारात गाढवाचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे आपल्या या सोबत्याला मान देणे आमचे कर्तव्य आहे,’ अशी भावना स्थानिक पशुपालकांनी व्यक्त केली. अंगावर विविध रंगांचे पट्टे मारून गाढवांना सजवण्यात आले. पावसात कृषी साहित्य पोहोचवतो ^पावसाळ्यात काळ्या मातीच्या शेतात वाहने चालत नाहीत. अशा चिखलाच्या वेळी आम्ही गाढवाच्या पाठीवर खते व इतर कृषी उपयोगी अवजड साहित्य थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत वाहून नेतो. – विष्णू महादेव चौरे, गाढव पालक. ^गाढव हा अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू प्राणी आहे. आमच्या रोजगारात त्याचा मोठा वाटा असल्याने त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे ही पूजा करतो. – अविनाश विष्णू चौरे, गाढव मालक.
Source link
अकोटमध्ये भोई, कुंभार समाजाने व्यक्त केली कृतज्ञता:जपली प्राण्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारी परंपरा