Headlines

ग्रामीण मराठी साहित्य संमेलन:शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची पेरणी करणारे दीपस्तंभ- लंके गुरुजी




शिक्षक हे भावी पिढीला मार्ग दाखवणारे आणि विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची पेरणी करणारे दीपस्तंभ आहेत. बदलत्या काळातही शिक्षकांना समाजात सन्मानाचे स्थान असून, त्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन ज्ञानदेव लंके गुरुजी यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे गुरुवारी आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक सीए डॉ. प्रकाश अंदानी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्षा हेमलता गिते, मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे, कवी रुपचंद शिदोरे, साहेबराव बोडखे, दिलावर शेख, अतुल फलके, चांद हुसेन शेख यांच्यासह अनेक मान्यवर, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनात बोलताना माधवराव लामखडे म्हणाले की, डिजिटल युगात वाचनाचे स्वरूप बदलले असून मोबाईल आणि ई-पुस्तकांच्या माध्यमातून वाचन सुरूच आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला दिशा देणारे विचार आहेत. तसेच, सीए प्रा. डॉ. शंकर अंदानी यांनी ग्रामीण भागातील साहित्यिकांनी मातीतले प्रश्न आणि संस्कृतीचे प्रभावी चित्रण केल्याचे स्पष्ट केले. संमेलनाचा मुख्य आकर्षण असलेला शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम अत्यंत जोशपूर्ण झाला. व्यसनमुक्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यावरील पोवाड्यांनी उपस्थितांची दाद मिळविली. प्रास्ताविकात नाना डोंगरे यांनी ग्रामीण साहित्यिकांस व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भाग्यलता जाधव, स्वप्निल काळे, शिवशाहीर सुनील चिंचोलीकर, प्रिती पवार, दिनकर दावभट, अशोक सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, राजेंद्र नष्टे, राजेंद्र भोस, बाळासाहेब देशमुख, अभिजीत पाचारणे, संगिता घोडके आणि अशोक भालके यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांनी केले, तर आभार संदिप डोंगरे यांनी मानले. काव्यसंमेलनातून ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण संमेलनातील काव्य मैफलीत श्रेयस लहामगे, पूनम भुतारे, चाँद शेख, गोविंद पाठक, दत्तात्रय फलके, अशोक मोहिते आणि मच्छिंद्र नवघरे यांनी कविता सादर केल्या. ग्रामीण जीवनातील सुख-दुःख, संघर्ष आणि शिक्षकांच्या योगदानावर भाष्य करणाऱ्या कवितांना रसिकांचा प्रतिसाद मिळाला. बाळासाहेब देशमुख यांच्या कथाकथनानेही उपस्थितांचे मन जिंकले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *