Headlines

कळमनुरी उपविभागात कुणबी जातीच्या 472 नोंदी आढळल्या:नागरिकांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन, एसडीएम प्रतिक्षा भुते यांची माहिती




कळमनुरी उपविभाग अंतर्गत कुणबी प्रमाणपत्रांसाठी मंडळ निहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी केले आहे. कळमनुरी उपविभागातील तहसिल कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि सह दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत जुन्या अभिलेखांची पाहणी व तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान 29 गावांमध्ये कुणबी जातीच्या एकूण 472 नोंदी आढळून आल्या आहेत. ​आढळून आलेली सर्व कागदपत्रे व नोंदी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतीवर डकवण्यात आल्या असून, नागरिकांसाठी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ​न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीच्या शिफारशीनुसार आणि महसूल विभागाच्या ई-सेवा केंद्रमार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार आतापर्यंत 2357 कुणबी जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. तसेच 2 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन, परिपूर्ण असलेल्या जात प्रमाणपत्र प्रस्तावांची तालुकास्तरीय वंशावळ समितीमार्फत तपासणी करून मराठा समाजातील पात्र व्यक्तींना 19 कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीची प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मराठा समाजास देण्यात आलेल्या एसइबीसी दहा टक्के आरक्षणानुसार ऑगस्ट 2026 अखेर अंदाजे 3215 प्रमाणपत्रे या कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले ​कुणबी प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने ही कार्यवाही अधिक जलद गतीने पार पाडण्यासाठी कळमनुरी उपविभागांतर्गत ता 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत मंडळ निहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाकोडी – 12 सप्टेंबर, नांदापूर – 13 सप्टेंबर, वारंगा फाटा – 14 सप्टेंबर, डोंगरकडा – 15 सप्टेंबर आ.बाळापूर – 16 सप्टेंबर, साळवा – 16 सप्टेंबर, कळमनुरी शहर / ग्रामीण – 17 सप्टेंबर रोजी शिबीर होईल. ​सदर शिबिरात कळमनुरी तालुक्यातील कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा पात्र नागरिकांनी जात प्रमाणपत्र मिळवण्याच्या अनुषंगाने व कार्यवाही जलद होण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *