![]()
समृद्धी महामार्गावर खेळण्यातील खोट्या नोटा रस्त्यावर टाकून वाहने थांबवायची आणि चालक खाली उतरताच त्याला लुटायचे, असा अत्यंत भीषण डाव रचणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील एका कुख्यात लुटारू टोळीच्या कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. महामार्गावर
.
९ सप्टेंबर रोजी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोपरगाव पोलीस समृद्धी महामार्गावर गस्त घालत होते. या दरम्यान नगर-मनमाड रस्त्यावरील पुलाखाली संशयित पिकअप (एमएच ०५ एफजे १७९८) दिसून आली. गाडीजवळील संशयितांचे संभाषण ऐकून पोलिसांनी तात्काळ घेराव घालत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून “भारतीय मनोरंजन बँक’ आणि “भारतीय बंचो का बँक’ अशा खेळण्यातील खोट्या नोटांचे १३ बंडल, लोखंडी तलवार, कत्ती, खिळे मारलेल्या लाकडी फळ्या, ४ मोबाईल आणि पिकअप असा एकूण ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संशयित आरोपी विवेक भरत शेलार (२३, रा. कल्याण पूर्व), ओमकार मारुती जगताप (१९, रा. उल्हासनगर), रोहित सुरेश परब (३१, रा. कल्याण) आणि बाळकृष्ण राहुल सपकाळे (१९, रा. उल्हासनगर) यांचा समावेश आहे. “बबलू’ नावाचा पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती यांच्या आदेशानुसार कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि शहर पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांनी पोलीस कर्मचारी प्रवीण रणधीर, गुंजाळ यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे करत आहेत.
पोलिसांनी ऐकले संभाषण अन् पकडले समृद्धी महामार्गावर दरोडा टाकण्यासाठी चारही संशयितांनी नियोजन केले होते. त्याप्रमाणे दोघांमध्ये संवाद सुरू झाला. पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन तो संवाद ऐकल्यानंतर त्यांचा संशय बळावला होता. यात एक व्यक्ती दुसऱ्याला सांगत होता, “आपण हायवेवर गेल्यावर जो पहिला भेटेल, त्याचे रक्त काढायचे, म्हणजे इतर लोक त्यांच्याकडचे पैसे व दागिने काढून देतात.’ हा भयानक संवाद ऐकताच पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी तत्काळ कारवाई करत चौघांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.