![]()
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर बापलेकांनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (18 एप्रिल) सायंकाळी वर्दळीच्या भगवान महावीर चौकात घडली. “तुम्ही फाइन कसा काय मारता?’ असे म्हणत या आरोपींनी भररस्त्यात पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली. या प्रकरणी पंकज खंदरे, अक्षय खंदरे आणि योगेश खंदरे (रा. वडगाव कोल्हाटी) या तिघा बापलेकांवर गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. भरचौकात हायव्होल्टेज ड्रामा सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सिग्नल तोडून जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला (एमएच 20 ईजी 0921) उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी रोखले. वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने चालकाने रस्त्यातच गाडी उभी करून वाहतूक कोंडी केली. पोलिसांनी कागदपत्रांची मागणी करताच आरोपींनी अश्लील शिवीगाळ सुरू केली. अंमलदार योगेश चौधरी त्यांना समजवायला गेले असता, आरोपींनी त्यांची कॉलर पकडून कानशिलात लगावली. मदतीला धावलेले अंमलदार पवार आणि जंगाळे यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हातात नोटा नाचवत पोलिसांच्या कुटुंबीयांबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी केली. बॉडी कॅमेरा, फ्री हँडची गरज अशा घटनांमध्ये ठोस पुराव्यासाठी पोलिसांना बॉडी कॅमेरे सक्तीचे करण्याची मागणी पोलिस दलातून होत आहे. पुराव्याअभावी आरोपी सुटत असल्याने पोलिसांना स्वसंरक्षणार्थ फ्री हँड आणि तंत्रज्ञानाचा आधार मिळणे काळाची गरज बनली आहे. दोन महिन्यांत 6 हल्ले; सुरक्षेचा प्रश्न शहरात गेल्या दोन महिन्यांत पोलिसांवर हल्ला होण्याची ही सहावी घटना आहे. 22 फेब्रुवारीला हायकोर्ट सिग्नलवरील मारहाण असो किंवा 18 मार्चला रिक्षाचालकाने केलेला हल्ला, पोलिसांवरील वचक कमी होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
Source link
‘फाइन का मारता?’ म्हणत ट्रॅफिक पोलिसाला मारहाण:छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात बापलेकांचा राडा; अश्लील शेरेबाजी