![]()
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राजकीय विश्लेषक आणि समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. अभ्यासपूर्ण मांडणी, परखड भूमिका आणि पुरोगामी विचारांसाठी ते महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात परिचित होते. संविधान, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समानतेच्या मूल्यांसाठी आयुष्यभर भूमिका घेणारा एक महत्त्वाचा वैचारिक आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. इंदापूर ते पुणे कर्मभूमी डॉ. महाजन हे मूळचे इंदापूर तालुक्यातील रहिवासी होते. उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी बनली. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. विविध भाषांतील साहित्य तसेच देश-विदेशातील राजकीय आणि सामाजिक विचारवंतांच्या लेखनाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. समाजवाद आणि गांधीवादी विचारसरणीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव होता. आणीबाणीविरोधी आंदोलनात सहभाग त्यांनी युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दल, भारत जोडो अभियान आणि विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. आणीबाणीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि ग. प्र. प्रधान यांसारख्या दिग्गज विचारवंतांचा सहवास त्यांना लाभला होता. शेतकरी प्रश्नांसाठी पदयात्रा १९८६-८७ मध्ये त्यांनी इंदापूर तालुक्यात शेतकरी, वीज, पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर पायी पदयात्रा काढली. यातून त्यांनी जनजागृती केली. पुणे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवरही त्यांनी आंदोलने केली होती. युवकांमध्ये वैचारिक जडणघडण आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यांनी ‘लोकबोधिनी’ संस्थेची स्थापना केली. युवक नेतृत्व शिबिरे, व्याख्याने, परिसंवाद, वादविवाद आणि सामान्य ज्ञान स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांशी संवाद साधला. काँग्रेसमध्ये प्रवक्तेपदाची भूमिका डॉ. महाजन यांनी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दोन वेळा सांभाळली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदावर काम करताना त्यांनी मानवी विकास अहवालाच्या माध्यमातून लोकाभिमुख धोरणे मांडली. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका मांडली. ‘शिदोरी’ मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी वैचारिक लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. असीम सरोदेंनी आठवणींना दिला उजाळा ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी डॉ. महाजन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील आणि डॉ. महाजन हे त्या काळात एकाच तुरुंगात होते. निर्भीड विचारवंताच्या निधनाने पोकळी दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चांपासून सोशल मीडियापर्यंत विविध विषयांवर डॉ. महाजन निर्भीडपणे भूमिका मांडत होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ———- हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 15वा दिवस: आंतरवालीत आज राज्यव्यापी बैठक, मुंबईत धडकण्याची तयारी; मराठ्यांनी घरी बसू नये, अख्खा महाराष्ट्र ठप्प करू- जरांगे मराठा आरक्षण, 58 लाख कुणबी-मराठा नोंदीसाठी आंतरवाली सराटी येथे 14 दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय १२ सप्टेंबर रोजी बैठकीत घेण्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मुंबईत धडकण्यावर पूर्वप्रतिबंधक बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळाली. केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या भीतीपोटी लोकशाहीत नागरिकांचा आंदोलनाचा कायदेशीर अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सविस्तर वाचा
Source link
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन:अभ्यासपूर्ण मांडणी, परखड भूमिका आणि पुरोगामी विचारांसाठी महाराष्ट्रात परिचित