![]()
गणेशोत्सव आणि इतर धार्मिक उत्सवांमध्ये होणारे बेसुमार ध्वनी प्रदूषण, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि घनकचऱ्याच्या समस्येवर कायदेशीर कारवाई न करणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणांना (पोलीस, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ) कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. प्रसिद्ध वकील ॲड. असीम सरोदे यांनी ही माहिती दिली. विद्यानंद बापट यांच्या पुढाकाराने आणि अनेक नागरी संघटनांच्या पाठिंब्याने ही नोटीस पाठवण्यात आली असून, 3 दिवसांत उत्तर देण्याची मागणी करण्यात आली आहे. काय आहेत नोटीसमधील प्रमुख मुद्दे? रस्त्यावरील मंडप आणि अतिक्रमणे अनेक ठिकाणी रस्त्यांवर रहदारीला धोकादायक ठरणारे मंडप उभारले आहेत. पोलिसांना अतिक्रमणाचा परवाना देण्याचा अधिकार नसतानाही ते कारवाईत कुचराई करत आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणारे मंडप तत्काळ काढावेत किंवा स्थलांतरित करावेत, अशी मागणी नोटिशीत आहे. ध्वनी प्रदूषण आणि ‘4 टॉप-4 बेस’ 4 टॉप आणि 4 बेसला दिलेली परवानगी ही दिशाभूल करणारी आहे. यावर कोणाचेही नियंत्रण राहत नाही. ढोल-ताशांच्या अनेक पथकांमुळे होणारा एकत्रित सामूहिक आवाजही ध्वनी प्रदूषणातच मोडतो. त्यामुळे ‘पारंपरिक वाद्य’ या नावाखाली ध्वनी प्रदूषणाला अजिबात सूट देता येणार नाही. घनकचरा आणि हवा प्रदूषण सर्व उत्सवांमध्ये (गणेशोत्सव, मोहर्रम, ईद, नवीन वर्ष) कचऱ्याचे ढीग आणि हवा प्रदूषण होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एकत्रित काम करावे. जर त्यांनी कारवाई केली नाही, तर या यंत्रणांवरच कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत दिला आहे. भावना दुखावल्याचा आरडाओरडा थांबवा विद्यानंद बापट यांना ‘हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल’ पाठवण्यात आलेल्या नोटिशीवर बोलताना ॲड. सरोदे म्हणाले, “ही नोटीस अत्यंत सुमार दर्जाची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार, ‘कमजोर मनाच्या आणि अपरिपक्व विचारशक्तीच्या लोकांच्या भावनांच्या आधारे, एखाद्याच्या भावना दुखावल्या की नाही हे ठरवता येत नाही.’ त्यामुळे आता ‘आमच्या भावना दुखावल्या’ असा एकतर्फी आरडाओरडा करणे थांबवले पाहिजे.” राजकीय प्रवृत्ती बिघडली, निर्बंधमुक्त उत्सव चुकीचे नेत्यांकडून ‘निर्बंधमुक्त’ उत्सवाची केली जाणारी घोषणा आणि ध्वनी प्रदूषणाला मिळणाऱ्या राजकीय पाठिंब्यावर ॲड. सरोदे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “ही सर्व राजकीय पक्षांमधली वाईट प्रवृत्ती आहे. नेत्यांना लोकानुनय (Populism) करायचा असतो. पण आता जनतेला समजले पाहिजे की, ध्वनी प्रदूषणाचे समर्थन करणारे नेते चांगले नाहीत. ट्रॅफिकचे नियम मोडणारा आणि बेकायदेशीर वागणारा माणूस चुकीचाच आहे, हे समाजात प्रस्थापित होण्याची वेळ आली आहे.” सदानंद दाते यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात कठोर पावले उचलल्यास परिवर्तन दिसू शकेल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला. गणेशोत्सवाआधी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना असीम सरोदे यांनी केलेल्या या मागण्यांमुळे पुण्यातील प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रस्त्यांवरील मंडप, वाहतूक कोंडी, डीजे, ढोल-ताशांचा आवाज, घनकचरा आणि पर्यावरणीय परिणाम या सर्व मुद्द्यांवर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, संबंधित यंत्रणांना 3 दिवसांत उत्तर देण्याची मागणी करण्यात आली असून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच कारवाईची मागणी आहे. त्यामुळे या नोटिसांवर पोलीस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काय प्रतिसाद दिला जातो आणि उत्सवाच्या काळात नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. —————- हेही वाचा… जरांगेंच्या उपोषणाचा 15वा दिवस: आंतरवालीत आज राज्यव्यापी बैठक, मुंबईत धडकण्याची तयारी; मराठ्यांनी घरी बसू नये, अख्खा महाराष्ट्र ठप्प करू- जरांगे मराठा आरक्षण, 58 लाख कुणबी-मराठा नोंदीसाठी आंतरवाली सराटी येथे 14 दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय १२ सप्टेंबर रोजी बैठकीत घेण्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मुंबईत धडकण्यावर पूर्वप्रतिबंधक बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळाली. केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या भीतीपोटी लोकशाहीत नागरिकांचा आंदोलनाचा कायदेशीर अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सविस्तर वाचा
Source link
उत्सवांमधील ध्वनी प्रदूषणावरून यंत्रणांना कायदेशीर नोटीस:'भावना दुखावण्याचा आरडाओरडा थांबवा' – ॲड. असीम सरोदे