Headlines

मुनगंटीवार उभे राहताच आणि धानोरकरांचा ‘वॉकआऊट’:चंद्रपुरात प्रोटोकॉलवरून मोठा वाद; लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत तक्रार




चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित हिराई महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठा वाद उफाळून आला. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट मंचावरूनच नाराजी व्यक्त केली आणि कार्यक्रम अर्धवट सोडून ‘वॉकआऊट’ केले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शासकीय कार्यक्रम असूनही मंचावर भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार सुरू असल्याने धानोरकर यांनी सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला. सार्वजनिक कार्यक्रमात पक्षीय कार्यक्रम मिसळणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वादाचा कळस मात्र त्यावेळी गाठला गेला, जेव्हा धानोरकर यांच्या भाषणानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार भाषणासाठी उभे राहिले. यावर धानोरकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राजशिष्टाचाराचा भंग होत असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, खासदारांच्या भाषणानंतर केवळ कॅबिनेट मंत्रीच बोलू शकतात. मात्र, त्या नियमाचे पालन न करता आमदारांना बोलावले जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर त्यांनी थेट मंच सोडून कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकारानंतर प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. प्रतिभा धानोरकर यांनी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात चंद्रपूर जिल्हा प्रशासनावर महिला खासदाराचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. धानोरकर यांनी या प्रकरणाला संसदीय विशेषाधिकारांचा मुद्दा म्हणून मांडत हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता आता राष्ट्रीय पातळीवरही चर्चेत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरणाला वळण मिळण्याची शक्यता दरम्यान, या घटनेवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंचावर घडलेल्या या प्रकारामुळे राजशिष्टाचाराचे नियम, त्यांची अंमलबजावणी आणि राजकीय शिष्टाचार यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाला आणखी वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *