Headlines

पाणीटंचाईला तोंड देण्यास पारनेरला सुपे एमआयडीसीतून पाणीपुरवठा द्या:आमदार दाते यांची मागणी, चारा टंचाई व वीज प्रश्नाकडे वेधले लक्ष‎




पावसाने पाठ फिरवल्याने पारनेर शहराला पाणीपुरवठा करणारा हंगे लघु पाटबंधारे तलाव कोरडा पडला आहे.सध्या तलावालगतच्या विहिरीतून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र तो अपुरा आहे.लवकरच विहीरही कोरडी पडण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे शहराला सुपे औद्योगिक वसाहतीच्या उदभवातून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली. जिल्ह्यातील संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात (अहिल्यानगर ) येथे शुक्रवारी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार दाते यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यासह जनावरांच्या चाऱ्याची कमतरता व वीज प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शहराची लोकसंख्या लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्यास टँकरच्या दररोज ६० ते ६५ खेपा कराव्या लागतील. टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी वापरला जाणारा कोहकडी येथील जलस्रोत शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असल्याने तेथून टँकर भरण्यास मोठ्या प्रमाणात वेळ व खर्च होणार आहे. त्यामुळे वेळ व आर्थिक बचत लक्षात घेऊन कोहकडीऐवजी एमआयडीसीच्या उद्भवातून पारनेर शहरासाठी टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार दाते यांनी केली. दरम्यान,पावसाने दडी मारल्याने आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता असल्याचे आ.दाते यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. टंचाईच्या परिस्थितीत जनावरे व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी चारा छावण्यांऐवजी जनावरांच्या संख्येनुसार शेतकऱ्यांना थेट ”डीबीटी”च्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले. मतदारसंघातील शेतकऱ्यांना सातत्याने वीजपुरवठ्याच्या समस्या भेडसावत असल्याचेही आ.दाते यांनी बैठकीत स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या शेतीपंपांसह वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी तातडीने दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे सकारात्मक पारनेरला सुपे औद्योगिक वसाहतीतीतून पाणीपुरवठा करावा या आमदार दाते यांच्या मागणीची पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक दखल घेत संबंधित यंत्रणेला उद्भव बदलण्यासाठी पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आगामी टंचाईच्या काळात पारनेर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी पाठपुरावा : आ. दाते मतदारसंघात निर्माण होणाऱ्या संभाव्य टंचाईच्या परिस्थितीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा आणि शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्नही गांभीर्याने घेतला असून, सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. टंचाईच्या काळात प्रत्येक गावाच्या गरजेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना केल्या जातील. संकटाच्या काळात मी आपल्या सोबत खंबीरपणे उभा आहे,असे आमदार दाते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *