Headlines

मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मोठा प्लॅन:महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’, अमित शाहांनी केली मोठी घोषणा




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रवासानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून देशभरात विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत ‘सेवा संकल्प अभियान’ची घोषणा केली. येत्या 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत देशभरात हे अभियान राबवण्यात येणार असून, त्याअंतर्गत विविध सेवाभावी आणि लोककल्याणकारी उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. यंदा मोदींचा वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. 12 विविध कार्यक्रमांचे आयोजन ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत देशभरात 12 वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. यामध्ये रक्तदानासह विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचा समावेश असेल. भाजपचे कार्यकर्ते आणि सरकारच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. या अभियानाची माहिती देण्यासाठीच मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस गुजरातमध्ये विशेष पद्धतीने साजरा केला जात होता. त्यानंतर हा उत्सव देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाऊ लागला. मात्र, यंदा मोदींच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा महत्त्वाचा टप्पा लक्षात घेऊन विशेष स्वरूपात हे अभियान राबवले जाणार आहे. मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा 25 वर्षांचा प्रवास नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा टप्पा हा महत्त्वाचा असल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान म्हणून मोदी यांनी दीर्घकाळ देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास करत सातत्याने देशाचे नेतृत्व करणारे नेते देशात फार कमी असल्याचे शाह यांनी नमूद केले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगतीही शाह यांनी अधोरेखित केली. त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील या टप्प्याच्या निमित्ताने विविध सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीसांकडूनही अभियानाची माहिती मुंबईतील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘सेवा संकल्प अभियान’बाबत माहिती दिली. नरेंद्र मोदी यांनी 25 वर्षे देशाच्या प्रमुख पदांवर राहण्याचा विक्रम केला असल्याचे फडणवीस म्हणाले. गेल्या 12 वर्षांपासून ते भारताचे पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करत आहेत. या काळात भारताने केलेली प्रगती सर्वांनी जवळून पाहिली असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीत ‘सेवा भाव’ हा स्थायी भाव राहिला, असे फडणवीसांनी म्हटले. राजकारणापेक्षा सेवा आणि गरीब कल्याणाला प्राधान्य देण्याचा अजेंडा मोदी यांनी सातत्याने पुढे नेल्याचा दावाही त्यांनी केला. सरकार आणि पक्षाचे कार्यकर्ते थेट जनतेत जाणार ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ पक्षाचा कार्यक्रम न राहता जनतेशी थेट जोडला जाणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. या अभियानाच्या माध्यमातून सरकार तसेच भाजपचे कार्यकर्ते थेट जनतेमध्ये जाऊन विविध सेवाभावी उपक्रम राबवणार आहेत. सामान्य नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने या अभियानातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित उपक्रमांवर भर दिला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. महाराष्ट्रातही विविध कार्यक्रम महाराष्ट्र सरकारकडूनही ‘सेवा संकल्प अभियान’च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. या माध्यमातून सरकार आणि पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रम राबवले जाणार आहेत. मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील सेवा कार्याला अधोरेखित करण्याबरोबरच त्यांच्याप्रती असलेली आत्मीयता व्यक्त करण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दरम्यान, 17 सप्टेंबरपासून सुरू होणारे हे अभियान 17 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच तब्बल महिनाभर चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू होणाऱ्या या अभियानात देशभरातील भाजप कार्यकर्ते सहभागी होणार असून, विविध सेवाभावी कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा टप्पा आणि त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भाजपने हे अभियान जाहीर केले असून, आगामी काळात महाराष्ट्रासह देशभरात या अभियानाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि लोककल्याणकारी उपक्रमांना वेग येण्याची शक्यता आहे. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *