![]()
जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरिपातील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी यांसह अनेक पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत दहीहंडीच्या उत्सवावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असल्याचा आरोप करत अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येथे शेतकऱ्यांनी वाळलेल्या पिकांची दहीहंडी साजरी केली. या माध्यमातून त्यांनी थेट देवाला साकडे घालत, ‘देवा, हीच दहीहंडी समजून स्वीकार. जिल्ह्यात पाऊस पाड आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धाव. सरकारच्या लक्षात शेतकऱ्यांच्या मदतीचा सकारात्मक विचार आण,’ अशी भावनिक प्रार्थना केली. नांदेड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी खरिपातील सोयाबीन, कापूस आणि ज्वारी यांसारखी महत्त्वाची पिके मोठ्या प्रमाणात वाळत आहेत. काही भागांत पिकांची अक्षरशः धूळधाण झाली असून, पेरणीसाठी केलेला खर्चही हातात येणार की नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, पुढील रब्बी हंगामाची तयारी कशी करायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. एकीकडे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे दहीहंडीच्या कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असल्याची टीका शेतकऱ्यांकडून करण्यात आली. काही लोकप्रतिनिधींकडून दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध कलाकार आणि नृत्यांगनांना बोलावून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘शेतकरी संकटात असताना उत्सवांवर पैशांची उधळण कशासाठी?’ असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी वाळलेल्या पिकांची दहीहंडी करून आपली व्यथा प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ‘हाच काला समजून स्वीकार, देवा…’ या वेळी शेतकऱ्यांनी वाळलेली सोयाबीन, कापूस आणि इतर पिके एकत्र करून दहीहंडी तयार केली. ‘हाच आमचा काला समजून स्वीकार आणि जिल्ह्यात पाऊस पडू दे. महाराष्ट्रातील शेतकरी सुखी होऊ दे. सरकारला शेतकऱ्यांची परिस्थिती समजू दे,’ असे साकडे त्यांनी देवाला घातले. शेतकऱ्यांनी या उपक्रमातून केवळ धार्मिक प्रार्थना केली नाही, तर सरकार आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे वेधण्याचा प्रयत्न केला. पाऊस नसल्याने पिके वाळत असताना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला असून, खरिपाची पेरणी वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातात यंदाच्या खरिपातून काहीही उत्पन्न मिळण्याची शक्यता नसल्याचे शेतकरी नेते संतोष गव्हाणे यांनी सांगितले. राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करावी. प्रति हेक्टर एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी संकटात असताना सरकारने केवळ पाहत न बसता तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, वाळलेल्या पिकांची दहीहंडी करून करण्यात आलेला हा निषेध सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. उत्सवाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘पाऊस पाड आणि शेतकऱ्यांना वाचव’ असा भावनिक संदेश दिला आहे. हेही वाचा.. सणासुदीच्या काळात आंदोलन करणं संयुक्तिक नाही:पोलिसांवरील ताणाचं भान राखावं; प्रवीण दरेकरांचे जरांगेंना आवाहन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मुंबईकडे प्रस्थान करण्याची घोषणा केली आहे. 15 सप्टेंबरला ते आंतरवालीतून निघणार असून आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी यावर सावध आणि सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने सणासुदीच्या काळात आंदोलन करणे कोणत्याही अर्थाने संयुक्तिक ठरणार नाही, असा सल्ला दरेकर यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. सविस्तर वाचा..
Source link
संतप्त शेतकऱ्यांचा अनोखा निषेध:वाळलेल्या पिकांची दहीहंडी, ‘देवा पाऊस पाड’ म्हणत सरकारला इशारा