![]()
येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र, इतिहास आणि गृहअर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणपूरक गणपती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करणे ही काळाची गरज असून गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक व सांस्कृतिक उत्सवांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे मत प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.अशोक इंगळे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. संतोष पाटोळे, कला शाखा प्रमुख डॉ. संतोष कायंदे तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉ. सचिन कोठेकर उपस्थित होते. ‘पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल. विविध नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पकतेने वापर करून आकर्षक, कलात्मक आणि नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी माती, कागद, नैसर्गिक घटक तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या माध्यमातून ‘पर्यावरण वाचवा, निसर्ग जपा’ हा संदेश देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. अश्विनी फोकमारे यांच्यासह डॉ. नूतनवर्षा देशमुख, डॉ. भरत नागरे, डॉ. प्रिया अंदूरकर, डॉ. दीपाली भटकर आणि प्रा. धर्मा गावंडे यांनी विशेष सहकार्य केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यांनी मारली बाजी पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेत स्वाती ठाकरे यांनी प्रथम क्रमांक, विकास पुंडकरे यांनी द्वितीय क्रमांक, तर साहिल काळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून गौरवण्यात आले.
Source link
सण, उत्सव पर्यावरणपूरक करणे काळाची गरज- डॉ. सुनील पांडे:गणपती स्पर्धेतून "पर्यावरण वाचवा, निसर्ग जपा’चा संदेश