![]()
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला एफआयआर (FIR) आणि राज्यातील विविध प्रलंबित प्रश्न यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिशा सालियन प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांना नक्कीच क्लीन चिट मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच, निवडणुका लवकर लागण्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळेल दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, “दिशा सालियन यांच्या वडिलांच्या जबाबावरून ते नाव जोडण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावेळीही मुद्दामून राजकीय दृष्टिकोनातून काहींनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले होते, पण नंतर त्यांना क्लीन चिट मिळाली. आता या प्रकरणातही त्यांना क्लीन चिट मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आमचा सीबीआयवर विश्वास नसला तरी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.” निवडणुका लवकर लागणार का? या कारवाईच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार म्हणाले, “पुढची तीन वर्षे कोणतीही निवडणूक नसताना जर त्यांचे नाव घेतले जात असेल, तर मला शंका वाटते की विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका लवकर घेतल्या जातील की काय? अशी शंका आता आम्हा सर्वांना वाटू लागली आहे.” देसाईंनी मीडियासमोर येऊन पूर्ण सत्य सांगावे ‘मनोज जरांगे पाटील अर्धसत्य बोलत आहेत’, या मंत्री शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याचा समाचार घेत रोहित पवार यांनी सरकारला थेट आव्हान दिले. “जर जरांगे अर्धसत्य बोलत आहेत असे त्यांना वाटत असेल, तर पूर्ण सत्य काय आहे, हे सांगण्यासाठी देसाई साहेबांनी मीडियासमोर यावे. काय चर्चा झाली, काय नाही झाली, याची स्पष्टता लोकांसमोर येणे आणि मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. सत्ता आणि निर्णय घेण्याची ताकद सरकारच्या हातात आहे, त्यामुळे नुसते मीडियामध्ये अर्धसत्य बोलून चालत नाही,” असे पवार म्हणाले. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित, सरकारची चालढकल मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींवरही पवारांनी भाष्य केले. “उपोषण काळात आंदोलकांना अनेक अडचणी सोसाव्या लागल्या. हॉटेल, चहा-पाणी बंद होते, स्वच्छतागृहांची व्यवस्था नव्हती. सरकारने याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा,” असे ते म्हणाले. याशिवाय, राज्याला भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, “आज राज्यात सर्व समाज दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. अवकाळी पावसाची मदत अद्याप मिळालेली नाही. विद्यार्थी एमपीएससी (MPSC) आणि सीईटी (CET) साठी लढत आहेत, महिला सुरक्षिततेचा प्रश्न प्रलंबित आहे. इतके सर्व प्रश्न असताना सरकार जर निर्णय घेत नसेल, तर ते मुद्दामून विषय लांबवत आहेत हे स्पष्ट होते.” ——————– ही बातमी पण वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 18वा दिवस, आज मुंबईकडे कूच:आझाद मैदानाच्या परवानगीचा तिढा कायम, तिसऱ्यांदा अर्ज; आंदोलक म्हणाले- आम्ही गणपती पाहायला जाणार मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासाठी दोन वेळा परवानगी नाकारूनही जरांगे पाटील आणि मराठा समाज आपल्या ‘मुंबई चलो’च्या भूमिकेवर ठाम आहे. आता मनोज जरांगे आणि काही वकिलांनी मिळून तिसऱ्यांदा पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. सविस्तर वाचा
Source link
सरकारने जरांगेंशी चर्चा करून लवकर निर्णय घ्यावा:रोहित पवारांचा सरकारला सल्ला, दिशा सालियन प्रकरणावर म्हणाले- आदित्य ठाकरेंना क्लीनचिट मिळेल