![]()
दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच महाराष्ट्राबाबत केलेले विधान, या तिन्ही मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणाचा तपास आणि बातम्या या पूर्णपणे ‘मॅनेज’ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दिशा सालियन FIR चा कट सह्याद्रीवर शिजला दिशा सालियन प्रकरणात संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “जोपर्यंत ठोस पुरावा नाही, तोपर्यंत कुणालाही आरोपी म्हणता येणार नाही. राष्ट्रीय स्तरावर आलेल्या या सर्व बातम्या मॅनेज आहेत. १६ पानांच्या एफआयआरमधून फक्त एकच पान बाहेर कसे येते? रविवारी सह्याद्री विश्रामगृहावर दोन महान नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर ते एकाच गाडीतून एशियाटिक लायब्ररीमध्ये गेले. या प्रवासात आणि बैठकीत जे ठरले, त्यानुसारच हा एफआयआर लिहिला गेला आणि तो कागद बाहेर आला.” केंद्रातील सरकार अंतर्विरोधाने खिळखिळे झाल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असा अनैतिक दबाव आणला जात असल्याचे राऊत म्हणाले. जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष हटवण्याचा डाव मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघणार आहेत. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच, दिशा सालियन प्रकरण मुद्दाम उकरून काढण्यात आले आहे. “हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. जरांगेंचे उपोषण आणि त्यांच्या महाराष्ट्रव्यापी प्रश्नावरून लोकांचे लक्ष दूर व्हावे, म्हणूनच गणपती उत्सवाच्या काळात हा पहिला मुद्दा प्रकर्षाने चर्चेत आणण्यात आला आहे,” असा दावा राऊत यांनी केला. “अमित शहांनी हिंमत असेल तर गुजरातमध्ये बोलून दाखवावे” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात ‘महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे’ असे विधान केले होते. यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. “महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. मुंबई किंवा महाराष्ट्र बहुभाषिक नाही. हेच वाक्य अमित शाहांनी हिंमत असेल तर चेन्नई, कलकत्ता, गुजरात किंवा कर्नाटकात जाऊन बोलावे… दगडाला पाय लावून पळून जाल. पण महाराष्ट्रातले शंढ राजकर्ते हे वाक्य ऐकतात आणि टाळ्या वाजवतात. १०६ हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र मराठी माणसाचा व्हावा म्हणून बलिदान दिले आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. “कुणीतरी येतोय आणि महाराष्ट्राच्या धोतराच्या कासोट्याला हात घालतोय, पण राज्याचे मुख्यमंत्री उठून उभे राहून ‘हा महाराष्ट्र मराठी भाषिक आहे’ असे सांगण्याची हिंमत दाखवत नाहीत. खोटे गुन्हे दाखल करायचे असतील तर करा, पण मराठी भाषेसाठी मी तुरुंगात जायलाही तयार आहे,” असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 18वा दिवस, आज मुंबईकडे कूच: आझाद मैदानाच्या परवानगीचा तिढा कायम, तिसऱ्यांदा अर्ज; आंदोलक म्हणाले- आम्ही गणपती पाहायला जाणार मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासाठी दोन वेळा परवानगी नाकारूनही जरांगे पाटील आणि मराठा समाज आपल्या ‘मुंबई चलो’च्या भूमिकेवर ठाम आहे. आता मनोज जरांगे आणि काही वकिलांनी मिळून तिसऱ्यांदा पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. सविस्तर वाचा
Source link
संजय राऊतांचा सरकारवर घणाघात:म्हणाले- दिशा सालियनची फाईल ओपन करणं, हा तर जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्याचा डाव