Headlines

गणेशोत्सवाला राज्य महोत्सव दर्जा मिळाल्याने पुण्यात सांस्कृतिक जागर:शनिवारवाड्यावर 16 ते 18 सप्टेंबरला ढोल-ताशा, काव्य आणि लोककलांचा संगम




महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या निमित्ताने प्रथमच पुणे शहरात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित केला जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने याचे संयोजन करत आहेत. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि लोककलेचा वारसा राज्यभर पोहोचावा, या उद्देशाने 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान शनिवारवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. आमदार हेमंत रासने हे सार्वजनिक गणेशोत्सवातील सक्रिय कार्यकर्ते आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. गेल्या वर्षापासून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या काळात राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जात आहेत. तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. 16 सप्टेंबर रोजी ‘नादविष्कार’ हा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 ते रात्री 9.30 या वेळेत पारंपरिक ढोल-ताशा पथकांचा ‘नादविष्कार’ सादर केला जाईल. पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असलेल्या समृद्ध ढोल-ताशा परंपरेचा अनुभव शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत घेता येईल. पुण्यातील नामांकित पारंपरिक ढोल-ताशा पथकांकडून भव्य वादन सादर केले जाईल. ज्ञानप्रबोधनी, ‘स्व’रूपवर्धिनी, तेजस्विनी (महिलांचे झांज पथक) आणि शिवमुद्रा ही पथके यात सहभागी होतील. 17 सप्टेंबर रोजी ‘कणक — अक्षर अक्षर तुझेच आहे’ हे विशेष काव्य सादरीकरण आयोजित केले आहे. सायंकाळी 6 ते रात्री 9.30 या वेळेत हा कार्यक्रम होईल. मराठी साहित्य आणि कवितेच्या समृद्ध परंपरेला समर्पित या कार्यक्रमात ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ या संकल्पनेतून परंपरा, आधुनिकता, शब्द, भावना आणि भक्तीचा संगम अनुभवता येईल. 18 सप्टेंबर रोजी ‘फोक लोक — महाराष्ट्राच्या लोककलेचा जल्लोष’ हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोककला, लोकसंगीत आणि लोकपरंपरांचा रंगमंचावर आविष्कार केला जाईल. ‘गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब आहे,’ असे आमदार हेमंत रासने यांनी म्हटले. ते म्हणाले, ‘पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या परंपरेला महाराष्ट्र राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, लोककला आणि कलावंतांना व्यापक व्यासपीठ मिळाले आहे.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *