![]()
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला पुणेकर आणि बाहेरून आलेल्या भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेकांनी मेट्रोला पसंती दिली. 14 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 2 लाख 62 हजार 671 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. गतवर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 2 लाख 16 हजार 374 प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला होता. यंदा प्रवासी संख्येत 46 हजार 297 ने वाढ झाली असून, एकूण प्रवासी संख्येत 21.40 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गणेशोत्सवामुळे शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे देखावे आणि गणपती दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागात येत आहेत. ही गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता, गणेशोत्सव काळात दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेट्रोच्या महात्मा फुले मंडई स्थानकावर सर्वाधिक 51 हजार 533 प्रवाशांची नोंद झाली. गतवर्षीच्या 42 हजार 334 प्रवाशांच्या तुलनेत येथे 21.73 टक्के वाढ झाली आहे. जिल्हा न्यायालय स्थानकावर इंटरचेंज करणाऱ्या प्रवाशांची संख्या 58 हजार 948 होती, जी गतवर्षीच्या 48 हजार 359 प्रवाशांच्या तुलनेत 21.89 टक्के जास्त आहे. याशिवाय पीसीएमसी स्थानकावर 25 हजार 429, रामवाडी स्थानकावर 23 हजार 644, स्वारगेट स्थानकावर 21 हजार 99, तर पीएमसी स्थानकावर 19 हजार 267 प्रवाशांची नोंद झाली. गणेशोत्सवातील गर्दी पाहता, मेट्रोची सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कसबा पेठ, स्वारगेट, पीएमसी, डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान या स्थानकांचा वापर करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. परतीच्या प्रवासासाठी महात्मा फुले मंडई स्थानकाचा प्रामुख्याने वापर करावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे. स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्रवाशांनी तिकीट खिडकीसोबतच क्यूआर कोड, मेट्रो ॲप आणि व्हॉट्सॲपद्वारे डिजिटल तिकीट प्रणालीचा जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांनी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Source link
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मेट्रोतून 2.62 लाखांहून अधिक भाविकांनी प्रवास:गतवर्षीच्या तुलनेत 21.40 टक्के वाढ, पुणेकरांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिली पसंती