![]()
पुणे येथे ‘विश्वविनायक २०२६’ कलाप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते हे प्रदर्शन सुरू झाले. घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन १५ ते २० सप्टेंबरदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. यात गणपतीच्या विविध रूपांचे दर्शन घडवले जात आहे. अमित फाटक फाउंडेशन, अगस्त्य आर्ट्स, राष्ट्रप्रथम ट्रस्ट आणि सदैव फाउंडेशन यांनी तिसऱ्या ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२६’ अंतर्गत हे भव्य कलाप्रदर्शन आयोजित केले आहे. या उद्घाटनप्रसंगी ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे अध्यक्ष वैभव वाघ, विश्वस्त अनिरुद्ध येवले, माध्यम सल्लागार जीवराज चोले उपस्थित होते. तसेच चित्रकार रविंद्र देव, बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, हिंदू युवा प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ बेंद्रे, मिनुशील सडवेलकर आणि आर्याबाग सांस्कृतिक परिवाराचे कल्याण तावरे यांचीही उपस्थिती होती. दिग्पाल लांजेकर म्हणाले, “भारतीय संस्कृती, गणेशोत्सव आणि पारंपरिक कलांचा जगभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. गणेशोत्सवातून कलाकार घडतात आणि त्यांच्या कलाकृतींना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व कलेचा प्रसार जगभर व्हायला हवा. ग्लोबल गणेश फेस्टिव्हलच्या माध्यमातून ही संस्कृती व कला जगभर पोहोचवण्याचे काम होत आहे.” किरण केंद्रे यांनी सांगितले की, सध्या उत्सवांवरून विविध वाद सुरू असताना ‘कलायुक्त गणेश’ ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राचा हा उत्सव जगभरात नेणे महत्त्वाचे आहे. गणेशोत्सव हे कलेच्या सादरीकरणासाठी उत्तम माध्यम आहे, कारण गणेशापाशी कलेचा संगम होतो. त्यामुळे येत्या काळात अशा विधायक उपक्रमांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वैभव वाघ म्हणाले, “गणपती ही बुद्धी आणि कलेची देवता आहे. चर्चा करण्याऐवजी कृतीतून व्यक्त होणे अधिक महत्त्वाचे आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि कलांचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार व्हावा यासाठी तीन वर्षांपूर्वी या महोत्सवाची सुरुवात केली. ‘विश्वविनायक’ हा जगाला जोडणारा म्हणून ओळखला जावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवातून आपली कला सादर करावी, हाच मुख्य उद्देश आहे.”
Source link
'विश्वविनायक 2026' कलाप्रदर्शनाचे उद्घाटन दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते:भारतीय संस्कृती व कलेचा जगभर प्रसार व्हावा, लांजेकरांचे मत