![]()
आधी पुरेशी व सुरक्षित निवास व्यवस्था निर्माण करा, मगच मुख्यालयी राहण्याची सक्ती करा, अशी भूमिका घेत गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी मंगळवारी शहरातून भव्य मूक मोर्चा काढत पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे तालुक्यातील २४४ पै
.
मुख्यालयी न राहण्याच्या कारणावरून शिक्षण विभागाने गंगापूरमधील ७५३ आणि खुलताबादमधील ३३३ अशा एकूण १०८६ शिक्षकांची वेतनवाढ रोखली होती. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये संताप पसरला. या निर्णयाविरोधात सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. लासूर नाका येथून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे पंचायत समितीवर धडकला. शिक्षक संघाचे राज्यप्रमुख संभाजीराव थोरात यांनी कालबाह्य नियमांनुसार होणारी कारवाई चुकीची असल्याचे सांगत राज्यमंत्री योगेश कदम व आमदार अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिली. आंदोलनाला शिवसेना (उबाठा) नेते लक्ष्मण सांगळे, सुभाष कानडे, अविनाश पाटील आणि काँग्रेस तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड यांनी भेट देत पाठिंबा दिला. दरम्यान, सोयगाव तालुक्यातील शिक्षकांनी मंगळवारी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. शिक्षकांच्या हक्कावर गदा आणणारा आणि आर्थिक नुकसान करणारा हा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. १०७१ पैकी ९८२ शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्याने १९० शाळा बंद होत्या, तर ८९ शिक्षकांच्या उपस्थितीत ५४ शाळा सुरू राहिल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
१ हजार ७१ पैकी ९८२ शिक्षकांनी घेतला सहभाग