Headlines

ऋषिपंचमीनिमित्त पैठणच्या नागघाटावर महिला भाविकांची गर्दी:हजारो महिला भाविकांनी‎केले गोदावरीचे स्नान‎




दक्षिण काशी म्हणून प्रख्यात असलेली पैठणनगरी. या पैठणनगरीतील पालथीनगरी परिसरातील गोदाकाठी असलेल्या प्रसिद्ध नागघाटावर प्राचीन काळापासून ऋषी, मुनी, महंत व गुरुजनांनी तपश्चर्या केली होती. सप्तऋषी या ठिकाणी तप करत असताना प्रभू श्रीरामचंद्र पैठणनगरीत आले. सर्वप्रथम त्यांनी सिद्धेश्वरावर महादेवाचे दर्शन घेतले. प्रभू रामचंद्र गंगा-गोदावरी तीरावरून जात असताना नागघाट येथे त्यांची सप्तऋषींशी भेट झाली. त्यांनी त्या जागेवर अनुष्ठान केले. त्या वेळी सप्तऋषींनी असे सांगितले की, प्रतिवर्षी येणाऱ्या भाद्रपद शुद्ध पंचमी, म्हणजेच ऋषिपंचमीला, जे कुणी या ठिकाणी गंगास्नान, ऋषिपूजन तसेच दानधर्म करतील, ते आम्हाला पावन करतील. भाविकांची मनोकामना पूर्ण होईल, असा उल्लेख प्रतिष्ठान माहात्म्य व गोदा माहात्म्यामध्ये असल्याची माहिती पैठणचे कमलाकर गुरू शिवपुरी यांनी दिली. त्या दिवसापासून भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीला गंगा-गोदावरी स्नान करून ऋषी-मुनींचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक नागघाटावर येतात. तेव्हापासून दरवर्षी प्रथेप्रमाणे ऋषिपंचमी उत्सव नागघाटावर साजरा केला जातो. पैठण शहरासह मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. महिला पूजाअर्चा करण्यासाठीही येतात. ऋषी-मुनींच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या नागघाटावर ऋषिपंचमीला गुरुजनांचे आशीर्वाद मिळाल्यास कुटुंबात सुख-समाधान लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नागघाटावर भक्तांची मोठी गर्दी झाली होती. पाण्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता अडचणीचा महिला भाविकांना स्नानासाठी पाण्यापर्यंत जाण्यास मोठी कसरत करावी लागत होती. पिचिंगचे वाकडेतिकडे दगड होते. पिचिंगवर मोठ्या प्रमाणात उगवलेली काटेरी व इतर झाडे होती. त्यामुळे महिला भाविकांना मोठी अडचण निर्माण होत होती. अशा वेळी महिला भाविक नाराज होताना दिसत होत्या. अनेक महिलांनी बाहेरील नाथ मंदिरामागील कृष्णकमलातीर्थ येथे स्नान केले अन् परतीची वाट धरली. पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *